संशोधन : जन्मप्रक्रियेतील नवी क्रांती

जन्मप्रक्रियेतील नवी क्रांती
जन्मप्रक्रियेतील नवी क्रांती
Published on
Updated on

एमआरटी प्रजनन तंत्रज्ञानाला ब्रिटनने कायदेशीर मान्यता दिली आहे. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाबाबत वाद-प्रतिवाद होत असतातच. परंतु या सर्व प्रयत्नांच्या मुळाशी कुठे ना कुठे तरी अमरत्वाची आकांक्षा असतेच. त्याद़ृष्टीने विचार करता दुर्धर अनुवंशिक विकारांच्या शक्यता संपुष्टात आणणे ही या तंत्रज्ञानाची लक्ष्मणरेषा किंवा चौकट असायला हवी.

विज्ञान जगात सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाली होत असून त्याची माहिती सर्वसामान्यांना असतेच असे नाही. अशा स्थितीत एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. ती आहे तीन पालक असणार्‍या अपत्याची! नवजात मुलांमध्ये आढळणार्‍या अनुवांशिक आजारांपासून सुटका व्हावी म्हणून ब्रिटनमध्ये सुमारे 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये नव्या नियमांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार तीन पालकांच्या डीएनएचा वापर करून आयव्हीएफ तंत्राद्वारे मुलांना जन्म देण्याच्या प्रक्रियेला अधिमान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सने याला मंजुरी दिली होती. हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये त्यावर चर्चा होणे बाकी होते. त्याठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर अशा नियमाला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरणार असल्याने याबाबत बरीच उत्सुकता जगभरात दिसून येत होती. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या मुद्द्यावर ऐतिहासिक चर्चा झाली तेव्हा सदस्यांना आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून मते देण्याची परवानगी होती. कंझर्वेटिव्ह आणि लेबर पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले होते. त्यामुळे 128 विरुद्ध 382 मतांनी त्याला मंजुरी मिळाली होती.

आता आठ वर्षांनंतर मायटोकॉड्रियल रिप्लेसमेंट तंत्रज्ञान (एमआरटी) नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्रजनन तंत्रज्ञानाला ब्रिटनने कायदेशीर मान्यता दिली असून तो अशी मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. 2015 पासून आतापर्यंत या नवतंत्राद्वारे सुमारे पाच अपत्ये जन्माला आली आहेत. यूके फर्टिलिटी रेग्युलेटर, ह्युमन फर्टिलायजेशन अँड एम्ब्रियोलॉजी अथॉरिटी (एचएफईए) ने या नवीन शास्त्रीय शोधाला दुजोरा दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती स्पष्टपणे दिेली नाही. पण शास्त्रज्ञ या आधुनिक अभ्यासावर सातत्याने संंशोधन करत आहेत.

अपत्याला जन्म देणार्‍या या असामान्य प्रक्रियेची अधिक चर्चा होऊ नये, याची खबरदारी शास्त्रज्ञ घेत आहेत. साधारणपणे 'एमआरटी'चा उपयोग असाध्य आजारपणात केला जातो. कोणत्याही पालकांत किंवा माता-पित्यात अपत्यप्राप्तीत गंभीर समस्या येत असेल तर हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. यात एक पुरुष आणि दोन महिलांवर प्रयोग केला जातो. महिलांच्या वंध्यत्व निवारणासाठी हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे. स्त्री-पालक अपत्य जन्माला आणण्याच्या या प्रक्रियेचा वापर बहुतांश वेळी मायटोकॉड्रियल आजाराच्या स्थितीत केला गेला आहे. 'नेचर'मध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले की, अनुवांशिक आजार हा पुढची पिढी किंवा अपत्यात शून्यावर आणणे किंवा कमी करणे यासाठी या तंत्राचा वापर केला गेला आहे. जगात या तंत्रज्ञानाला फारसे आदराने पाहिले गेले नाही. मात्र यानिमित्ताने आणखी एक माहिती दिली जाते की, या तंत्रज्ञानाने 1990 आणि 2000 च्या दशकांच्या प्रारंभी अपत्य झाले. आयव्हीएफ आधारित प्रजनन प्रक्रियेतील हा पुढचा टप्पा आहे. या यशाला एखादा चमत्कार म्हणून पाहिले गेले आहे. परंतु त्याचा प्रयोग अजूनही वादग्रस्त मानला जात आहे.

देखरेख संस्था या ठोस कारणांच्या शोधात आहेत, जेणेकरून या तंत्रज्ञानाला मान्यता देता येईल. अर्थात यातील धोका म्हणजे हे तंत्रज्ञान सहजपणे उपलब्ध झाले तर त्याचा दुरुपयोग होण्याची अधिक शक्यता आहे. तसेच या तंत्रज्ञानाने जन्मलेल्या बाळावरील अधिकार आणि त्याच्या तीन-तीन पालकांचे अधिकार आणि जबाबदारी यावरून देखील समस्या निर्माण होऊ शकते. दुसरीकडे काही पालक बाळाचा चेहरा, लिंग आणि त्वचेत मनाप्रमाणे बदल करून घेऊ शकतात. या गोष्टी रोखण्यासाठी सध्या कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. अमेरिकेत या तंत्रज्ञानाला अद्याप मान्यता दिलेली नाही. 2015 मध्ये एका अमेरिकी शास्त्रज्ञाने या माध्यमातून प्रजनन प्रक्रिया विकसित केली. परंतु हे काम त्यांनी मेक्सिकोच्या भूमीत केले होते.

विज्ञानाच्या अशा शोधांवरून लोकांत खूप उत्सुकता असते आणि वादही आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील अभ्यासक डेगन वेल्स म्हणतात की, ही खरोखरच आश्चर्यकारक बातमी आहे. परंतु वास्तवात कितपत काम करेल, हे अद्याप ठाऊक नाही. प्रश्न अनेक असून आणि उत्तरे शोधण्याची गरज आहे. प्रत्यक्षात जेव्हा लोकांना अशा प्रजनानातून लाभ मिळेल किंवा मानवप्राण्याला एखाद्या गंभीर आजारापासून मुक्ती मिळेल, तेव्हा त्यास सर्वमान्यता मिळू शकते. शास्त्रज्ञ म्हणतात, वंध्यत्व उपचाराच्या द़ृष्टीने ग्रीस आणि युक्रेनमध्ये 'मायटोकॉड्रियल ट्रान्सफर'च्या माध्यमातून अपत्यप्राप्ती झाली आहे. लोकांना या तंत्राच्या सर्वंकष हिताची प्रतीक्षा आहे.

या तंत्रामुळे प्राणघातक आजार आईद्वारे मुलामध्ये अनुवांशिकरीत्या जाण्यावर प्रतिबंध निर्माण होऊ शकेल. ब्रिटनमध्ये दर 6,500 पैकी एका मुलामध्ये अनुवांशिक समस्या आढळून येतात. भविष्यात त्याचा हृदय, डोळे, यकृत यांच्या गंभीर आजारांमध्ये त्याचे रूपांतर होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते दुसर्‍या महिलेच्या डीएनएमुळे सुमारे 2,500 महिलांना त्याचा लाभ होऊ शकतो, त्यामुळे त्यांची मुले अनुवांशिक आजारांपासून दूर राहतील. नवजात बाळातील आनुवंशिक आजारांचे उच्चाटन करण्यासाठी डॉक्टर मातेच्या एग्जच्या न्यूक्लियसमधील आजारी मायटोकॉन्ड्रियाला हटवले जाते.

डोनर मातेच्या एग्जला रिक्त करून निरोगी मायटोकॉन्ड्रियालास वडिलांच्या शुक्राणूशी फर्टिलायझ्ड केले जाते. त्यानंतर फर्टिलायझ एगला मातेच्या गर्भात रोपित केले जाते. त्यामुळे बालकात जन्मत: येणार्‍या आनुवंशिक आजाराची शक्यता संपुष्टात आणली जाते. तथापि, रूढीवादी किंवा पारंपरिक विचासरणी असणार्‍या अनेकांनी या नव्या तंत्रज्ञानाचा विरोध केला आहे. ही अनैतिक आणि धोकादायक पद्धत असल्याचे म्हणणे आहे.

ब्रिटननंतर चीनमध्येही अशा प्रकारचा एक प्रयोग झाला होता. चीनमधील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने 2018 मध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्याबाबतची सविस्तर माहिती जर्नल 'नेचर'मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार या प्रयोगाचा उद्देश डिझायनर बाळ तयार करणे नसून रोगमुक्तीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे असा युक्तिवाद शास्त्रज्ञांकडून करण्यात आला होता. पण या प्रयोगामुळे भविष्यामध्ये एखाद्या सिनेतारकासारखी अथवा प्रसिद्ध दिसणार्‍या व्यक्तीप्रमाणे दिसणार्‍या बाळांची निर्मिती करण्याची मागणी केली जाऊ शकते आणि त्यानुसार कदाचित पुरवठाही होऊ शकतो अशी चर्चा झाली होती.

कोणत्याही नव्या शोधाबाबत, तंत्रज्ञानाबाबत वाद-प्रतिवाद होतच असतात. परंतु एक गोष्ट निश्चितपणे मान्य करावी लागेल की, या सर्व प्रयत्नांच्या मुळाशी कुठे ना कुठे तरी अमरत्वाची आकांक्षा आहे. पौराणिक कथांमध्येही अमरत्व मिळवण्यासाठी सूर आणि असुरांचा संघर्ष पाहायला मिळत असे. कलियुगातही त्याचीच पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. पण म्हणून नवे काही स्वीकारायचेच नाही असे बिल्कूल नाही. ते स्वीकारताना नैतिकतेचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने विचार करता दुर्धर अनुवंशिक विकारांच्या शक्यता संपुष्टात आणणे ही या तंत्रज्ञानाची लक्ष्मणरेषा किंवा चौकट असायला हवी.

डॉ. संतोष काळे 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news