

पुढारी ऑनलाईन: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. कसबा पेठची निवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यात करण्यात आलेली बॅनरबाजी ही निवडणुकीपेक्षा जास्त चर्चेचा विषय ठरली होती. यामध्ये आता राजकीय फायद्यासाठी देवांचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर यांनी फेसबुक पोस्ट करत हा आरोप केला आहे. त्यांनी ही पोस्ट करून विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
यांचा सोनं-चांदी वाटण्याचा स्पीड असाच राहिला कसब्याच्या चौकातील प्रत्येक गणपती मंडळ 'श्रीमंत' व्हायला वेळ लागणार नाही. माननीय विश्वस्त साहेब, स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आमच्या गणपती बाप्पाचा वापर करणं बंद करा, असं महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या कसबा मतदार संघात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
ही फेसबुक पोस्ट करुन महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. हेमंत रासने हे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विश्वस्त आहेत. रासने यांच्यावर मतदानासाठी गणपती मंडळांना सोनं-चांदी वाटप करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. आता या पोस्ट वर भाजप काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.