

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय कर्तव्यावरून प्रशिक्षक राहुल द्रविडच्या सतत गैरहजर असण्यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री नाराज झाले आहेत आणि त्यांनी शब्दरूपाने ती व्यक्त केली आहे. आयपीएल काळात वर्षातील तीन महिने सुट्टी मिळत असताना आणखी सुट्टी कशाला हवी, अशी विचारणा शास्त्री यांनी केली आहे.
2022 च्या विश्वचषकातील पराभवानंतर टीम इंडिया 2024च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौर्यात रोहित, विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिली गेली आहे, शिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह सपोर्ट स्टाफ सदस्यांनाही विश्रांती दिली गेली आहे. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दौर्यावर भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या गोष्टीवरून राहुल द्रविड व सपोर्ट स्टाफवर टीका केली आहे. शास्त्री म्हणाला, माझा ब्रेकवर विश्वास नाही. मला माझ्या संघाला व खेळाडूंना समजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर संघाचे संतुलन तयार करायचे आहे. मग सतत ब्रेक घेण्यात काय अर्थ? आयपीएल स्पर्धेदरम्यान दोन-तीन महिन्यांचा ब्रेक मिळतो, तेवढा पुरेसा आहे. अन्य वेळेस प्रशिक्षकाने संघासोबत असायला हवे, असे शास्त्री म्हणाले.