file photo
file photo

रत्नागिरी : खेडमध्ये जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी

Published on

खेड; अनुज जोशी :  शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत असून जगबुडी या प्रमुख नदीने 7 मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरानजीक वाहणार्‍या या नदीला पूर आल्याने किनार्‍यावरील बंदर रोड पाण्याखाली गेला असून पुराचे पाणी पालिकेच्या मटण- मच्छी मार्केट येथून बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. अतिवृष्टी सुरूच असल्याने प्रशासन पूरपरिस्थिती उद्भवल्यास सामोरे जाण्यासाठी सतर्क झाले आहे.

गुरुवारी दि. 6 रोजी सकाळी 8 ते शुक्रवारी दि.7 रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात खेडमध्ये 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण 690 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 11 वाजता जगबुडी नदीने 6.75 मीटर पातळी गाठल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. नदी किनार्‍यावरील गावातील नागरिकांना तसेच खेड बाजारपेठेतील व्यापार्‍यांना धोक्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला. अतिवृष्टीची परिस्थिती पाहता शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचता यावे म्हणून नियोजित वेळे पूर्वीच पालकांसोबत सम्पर्क साधून घरी पाठवले.

खेड शहर जगबुडी नदी व नारिंगी नदी किनारी वसलेले असून या नद्यांना येणार्‍या पुराचा फटका खेड बाजारपेठेला बसतो. सकाळी 12 वाजल्यापासून जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी पालिकेच्या मटण – मच्छी मार्केट परिसरातून बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली आहे. तर नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरातील नाना – नानी पार्कजवळून खेड – दापोली मार्गावर येणार सुरुवात झाली आहे.
अतिवृष्टी सुरूच असून मुसळधार कोसळणार्‍या पावसाच्या सरींमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात देखील नागरिक भयभीत झाले आहेत. नदी किनार्‍यावर बहुतांश भातशेती असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरद, नारिंगी, सोनपात्रा इत्यादी उप नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नुकत्याच करण्यात आलेल्या लावणी चे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

खेड तालुक्यातील नातुवाडी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण 1212 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणात 13.059 दशलक्ष घन मीटर एव्हढा पाणीसाठा झाला आहे. धरण 47.96 टक्के भरले असून अतिवृष्टीमुळे त्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून अतिवृष्टीमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसतानाच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news