

प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या ठिकाणांना अलौकिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Ram Navami Special) प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत या मार्गावरून प्रवास करणे ही गोष्टसुद्धा तितकीच आनंददायी ठरते. निसर्गाचे विविध आविष्कार, संस्कृतीची वैविध्ये आणि सोबतीला प्रभू रामचंद्रांची आठवण या सगळ्या गोष्टी या मार्गावरून भटकंती करायला प्रवृत्त करतात.
प्रभू श्री रामचंद्र हे आजही एक आदर्श पुरुष म्हणूनच ओळखले जातात. वनवासाची 14 वर्षे व्यतीत करताना सीतामातेचे अपहरण आणि त्यामुळे तिच्या शोधार्थ त्यांना करावे लागलेले पदभ्रमण हा एक कुतूहलाचा विषय आहे. त्या सगळ्या पदभ्रमण मार्गाचा मागोवा घेतला, तर आपल्याला आजही निसर्गाची, संस्कृतीची, लोकजीवनाची विविधता दिसून येते.
प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य जिथे जिथे झालेले आहे, त्याठिकाणी त्यांची मंदिरे निर्माण केली किंवा त्यांच्या निरनिराळ्या मूर्ती निर्माण केल्या. प्रभूरामांच्या सान्निध्याने पावन झालेली ठिकाणे आता तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जाऊ लागली. अगदी शरयू तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीपासून पाहू गेले, तर आजही अयोध्येत प्रभू रामांच्या अस्तित्वाच्या खुणा वेगवेगळ्या मंदिरांच्या रूपाने दिसून येतात. श्री
राम वनवासाला निघताना अयोध्येवरून निघाले, ते सर्वांत प्रथम अयोध्या नगरीपासून जवळच असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले. त्यानंतर त्यांनी गोमती नदी ओलांडली आणि जवळ असलेल्या शृंगवेरपूरला गेले. या ठिकाणी निषादराज गुहाचे राज्य होते. याच ठिकाणी श्रीराम गंगा नदीच्या किनारी गेले. तिथून नावाड्याने त्यांना गंगा नदी पार करून दिली.
प्रयागराज, शृंगवेरपूर ही आज उत्तर प्रदेशातील महत्त्वाची तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. गंगा नदी ओलांडल्यानंतर प्रभू रामचंद्र सिंगरौर या गावी येऊन पोहोचले. वाल्मिकी रामायणात गंगेच्या किनार्यावर वसलेल्या या गावाचा उल्लेख येतो. महाभारतात तर सिंगरौरचा उल्लेख तीर्थस्थळ म्हणून केलेला दिसतो. सिंगरौरवरून पुढे श्रीराम कुरई गावात येऊन पोहोचले. इथून पुढचा त्यांचा प्रवास हा प्रयागराजच्या दिशेने होतो. प्रयागराज म्हणजे गंगा-यमुना-सरस्वती यांचा त्रिवेणी संगम असलेले पवित्र ठिकाण. आजही या ठिकाणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. (Ram Navami Special)
इथे श्रीरामांनी यमुना नदी ओलांडली आणि ते चित्रकूटकडे मार्गस्थ झाले. चित्रकूटला पोहोचल्यावर इथे त्यांची भरताशी भेट झाली. इथेच भरताने त्यांना परत अयोध्येला येऊन राज्य सांभाळावे, याचा आग्रह केला. तेव्हा श्रीरामांनी भरताला अत्यंत धीराचा सल्ला देऊन परत पाठवले. चित्रकूट इथे भरताने रामाच्या पादुका मागून घेतल्या आणि त्या पादुका गादीवर ठेवून, पुढे भरताने श्रीरामांच्या नावाने राज्य केले. चित्रकूट हे ठिकाण अगदी रामायण काळापासून प्रसिद्ध आहे. चित्रकूट या पवित्र आणि महत्त्वाच्या ठिकाणी पुढे नानाजी देशमुख यांनी तितक्याच निरपेक्ष वृत्तीने समाजकार्य केले.
चित्रकूट हे ठिकाण त्यामुळे आजही मोठ्या आदराने घेतले जाते. श्रीरामांचा पुढचा मुक्काम हा अत्रि ऋषींच्या आश्रमात होता. हा आश्रम आजच्या सतना इथे होता. याच ठिकाणी श्रीराम आणि लक्ष्मण यांनी अत्रि ऋषींना त्रास देणार्या आणि त्यांच्या यज्ञात सतत विघ्ने आणणार्या राक्षसांचा बंदोबस्त केला. तिथून पुढचा श्रीरामांचा बराचसा काळ हा दंडकारण्यात व्यतीत झाला. अत्यंत घनदाट जंगल असलेला हा सगळा प्रदेश.
आजच्या मध्यप्रदेश-छत्तीसगड इथला हा सगळा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. आजही इथल्या प्रदेशात खूप झाडी आहे. विशेषतः छत्तीसगड राज्यातील जगदलपूर, बस्तर हा सगळा भाग दंडकारण्यात समाविष्ट झालेला होता. दंडकारण्याचा उल्लेख पुराणग्रंथांतूनही अनेक ठिकाणी आलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर दंडकारण्यातून विदर्भातील रामटेकमार्गे प्रभू श्रीरामांचा प्रवास पंचवटी क्षेत्री झाल्याचे दिसते. विदर्भात एक रामक्षेत्र रामटेक इथे वसलेले आहे. रामटेक इथले मंदिर हे 18 व्या शतकात नागपूरचे रघुजी भोसले यांनी बांधले. रामटेक या स्थानाचा संबंध कवी कालिदास आणि त्याने रचलेल्या 'मेघदूत' काव्याशीसुद्धा जोडला गेलेला आहे.
इथून पुढे रामचंद्रांचा प्रवास पंचवटी इथे होतो. पंचवटी हे आजच्या नाशिकमधले एक धार्मिक ठिकाण होय. अगस्त्य ऋषींचा आश्रम याच पंचवटी येथे होता. अगस्त्य मुनींनी श्रीरामांना इथे विविध शस्त्रे भेट दिली. नाशिकात गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान पंचवटी म्हणून ओळखले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. याच ठिकाणी श्रीराम आणि लक्ष्मणाने खर व दूषण या राक्षसांचा वध केला. सोन्याचे हरीण, मारिच राक्षसाचा वध हे प्रसंग याच ठिकाणी घडले.
रामायणात पंचवटी क्षेत्राचे महत्त्व फार मोठे आहे. आजच्या नाशिकमध्ये असलेले काळाराम मंदिर असेच एक महत्त्वाचे रामक्षेत्र. पूर्वीचे मंदिर आक्रमकांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्यावर सध्याचे मंदिर सन 1788 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधले. पूर्वीच्या मंदिरातील राममूर्ती गोदावरीत टाकून दिलेल्या होत्या, त्या त्यांनी परत मिळवल्या आणि त्यांची स्थापना मंदिरात केली. काळ्या पाषाणातील मूर्ती असल्यामुळे साहजिकच त्याला काळाराम असे नाव पडले. श्रीरामांच्या पाऊलखुणा इथल्या परिसरात विखुरलेल्या आहेत.
सीतामातेचे अपहरण याच क्षेत्रातून रावणाने केले. पुढे नाशिकपासून जवळ असलेल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईजवळच टाकेद तीर्थ नावाचे ठिकाण आहे. इथे जटायूचे मंदिर आहे. सीतेला पळवून नेत असताना जटायूने रावणाशी लढाई केली आणि त्यात जटायूचे प्राणोत्क्रमण याच ठिकाणी झाल्याचे समजले जाते. या ठिकाणाला 'सर्वतीर्थ' असे म्हटले जाते. इथे श्रीरामांनी जमिनीत बाण मारून तिथून पाण्याचा प्रवाह निर्माण केला आणि ते जल जटायूला पाजले. इथे जटायू मंदिर बांधलेले असून, त्यात श्रीरामाची देखणी मूर्ती जटायूला पाणी पाजताना दाखवलेली आहे. (Ram Navami Special)
सीतामातेच्या शोधार्थ इथून पुढे श्रीराम आणि लक्ष्मण निघाले. जटायूने दाखवलेल्या दिशेकडे – म्हणजे दक्षिणेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. हे दोघे बंधू पुढे तुंगभद्रा आणि कावेरी या नद्या ओलांडून पंपा क्षेत्री आले. इथे किष्किंधानगरी वसली होती. ही किष्किंधानगरी आणि पंपा सरोवराचा परिसर म्हणजे आजचे हम्पी होय. पुढे हे ठिकाण विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून उदयाला आले. हम्पी इथे असलेले 'हजार राम मंदिर' हेसुद्धा मूर्तिमंत रामचंद्रांचे दर्शन घेण्याचे अजून एक मोठे ठिकाण होय.
इ.स.च्या 15 व्या शतकात हे मंदिर तेव्हाचा सम्राट देवराया दुसरा याने बांधले. जेव्हा त्याने हे मंदिर बांधले, तेव्हा ते छोट्या रूपात होते. गर्भगृह, सभामंडप आणि अर्धमंडप एवढेच याचे स्वरूप होते. नंतर आलेल्या सम्राटांनी त्यात भर घालून अनेक खांब असलेला सभामंडप उभारला. मात्र किष्किंधानगरी म्हणजे आजचे 'अनेगुंदी' हे ठिकाण. इथे असलेल्या ऋष्यमूक पर्वतावर श्रीरामांची हनुमंत, सुग्रीव यांच्याशी भेट झाली. पुढे सुग्रीव-वाली युद्ध, त्यात वालीचा मृत्यू या सगळ्या घटना इथेच घडल्या. (Ram Navami Special)
वाली लपलेली गुहा आजही अनेगुंदीमध्ये दाखवली जाते. हनुमंताच्या सहकार्यामुळे सुग्रीवची सगळी सेना प्रभू रामाच्या पाठीशी उभी राहिली. या सर्व सेनेसह श्रीराम येऊन पोहोचले, ते भारताच्या दक्षिण टोकावर रामेश्वरम इथे. इथून पुढे ते सर्व सेनेसह धनुषकोडीला येऊन ठेपले. नल व नीलच्या मदतीने त्यांनी श्रीलंकेपर्यंत पूल बांधून घेतला. रामसेतू म्हणून तो आजही ओळखला जातो. धनुषकोडीहून होडीतून आता इथले नावाडी पर्यटकांन रामसेतूचे अवशेष दाखवयाला नेतात. या ठिकाणी समुद्राची खोली अत्यंत कमी असून, काही ठिकाणी तळ दिसतो.
आशुतोष बापट