

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूरला पाणीपुरवठा करावा, यासाठी विधानभवनाच्या पायरीवर आमरण उपोषण करणारा मी पहिला आमदार आहे. मात्र, जिल्ह्यातील काँग्रेसचा एक नेता याचे श्रेय घेऊ पाहत आहे. थेट पाईपलाईनसाठी कोणी कोणी संघर्ष केला. लढा दिला हे सारे कोल्हापूरवासीयांना माहिती आहे. थेट पाईपलाईन योजनेमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याने 75 कोटी रुपयांचा ढपला पाडला आहे. याची ईडीमार्फत चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मार्गी लागल्यामुळे शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी चौकात शनिवारी साखर व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, राजेश क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले, थेट पाईपलाईन योजनेसाठी आमरण उपोषण केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व इतर नेत्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मी उपोषण मागे घेतले. त्यानंतर योजना मंजूर झाली.
मी उपोषण केल्यावर मला श्रेय मिळू नये, म्हणून काँग्रेसच्या नेत्याने त्यावेळीही खटाटोप केला. शुक्रवारी रात्री काँग्रेसच्या नेत्याने पुईखडी प्रकल्प येथे जाऊन गुलाल उधळल्याचे ते म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, रणजित जाधव, किशोर घाटगे, उदय भोसले, अंकुश निपाणीकर, सुनील जाधव, मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगनेकर, अमरजा पाटील, नम्रता भोसले आदी उपस्थित होते.