

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात गुरुवारी दाखल अपिलावरील सुनावणी पूर्ण झाली. कारखान्याच्या वतीने अॅड. लुईस शहा, तर मूळ तक्रारदारांच्या वतीने अॅड. योगेश शहा यांनी युक्तिवाद केला. यावर सोमवारी निकाल देण्यात येणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध अर्ज ठरलेल्या उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे 31 मार्च रोजी अपील दाखल केले होते. याची सुनावणी मंगळवारी सुरू झाली. यामध्ये अपीलकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडत शेकडो कागदपत्रे सादर केली. गुरुवारी सकाळी 11 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. अवैध ठरवलेल्या उमेदवारांनी पोटनियमातील तरतुदीनुसार कारखान्याकडे करारात नोंद केलेला ऊस गळितासाठी कारखान्याला पुरवठा केला नाही, असा युक्तिवाद कारखान्याच्या वतीने अॅड. लुईस शहा यांनी केला. ही सुनावणी सुमारे तीन तास चालली.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने उपस्थित सहा. निवडणूक अधिकारी मालगावे यांनीही आपली बाजू मांडली. यावेळी परिवर्तन आघाडीचे अॅड. प्रतापराव इंगळे, अॅड. केदार लाड, अॅड. पंडित अतिग्रे, अॅड. प्रबोध पाटील, अॅड. अजित पाटील उपस्थित होते.
यावेळी सत्ताधारी आघाडीच्या वतीने कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, दिलीप उलपे आदी उपस्थित होते, तर परिवर्तन आघाडीच्या वतीने मोहन सालपे, बाजीराव पाटील, सर्जेराव माने आदी उपस्थित होते.
सुनावणी दरम्यान कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रशांत चिटणीस, सचिव उदय मोरे, प्रादेशिक उपसंचालक (साखर) सदाशिव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी प्रक्रिया शांततेत पार पडली.
आजअखेर 16 उमेदवारांची माघार
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. गुरुवारअखेर 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. शुक्रवार, शनिवार, रविवार निवडणूक कार्यालयाला सुट्टी आहे. बाळू गणू लाड (उत्पादक गट क्र. 3), शिवाजी दत्तू पाटील, अमोल भास्कर पाटील, महादेव गोपाळ बुडके, शामराव रामचंद्र तिबिले (उत्पादक गट क्र. 4), महिपती दौलू खडके (उत्पादक गट क्र. 6) या सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.