

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mumbai AC Local : मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठी भेट दिली आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात कपात करण्याच्या निर्णय घेण्यात आला असून भारतीय रेल्वे बोर्डाने याला मंजुरी दिल्याचे समोर आले आहे.
महागाईच्या काळात रेल्वेने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात कपात करण्याच्या निर्णयाला भारतीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. आता एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निम्म्या भाड्यात प्रवास करता येणार आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईतील एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात 50 टक्के कपात करण्याच्या निर्णयाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. आता तिकीट दर 130 रुपयांवरून 90 रुपयांवर पोहोचले आहेत. वेस्टर्न लाईन ते सेंट्रल लाईन पर्यंतचे भाडे किमीनुसार असेल.
लोकल ट्रेनला मुंबईची लाईफ लाईन म्हणतात. मात्र मुंबईत सध्या लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. 26 एप्रिल रोजी येथील तापमान 38.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. वाढत्या उन्हामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एसी लोकल ट्रेनची मागणी वाढली आहे. बहुतेक प्रवाशांना एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करायचा असतो. अशा परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये बसायला जागा मिळत नाही.
डिसेंबर 2017 मध्ये मुंबईत एसी लोकल सेवा सुरू झाली. ही भारतातील पहिली एसी लोकल सेवा होती. मुंबईतील पहिली एसी लोकल बोरिवली-चर्चगेट मार्गावर धावली. त्यानंतर इतर मार्गांवरही एसी गाड्या सुरू करण्यात आल्या.
या निर्णयावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मुंबईतील एसी लोकलच्या तिकिटांची किंमत कमी करण्याची मागणी लोकांकडून होत होती. आता त्यात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या दराबाबत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारचा दृष्टीकोन खूप छोटा आहे. भाजपचे सरकार असलेल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत.