

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सावकारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या जमिनी कमी किमतीत बळकावण्याचा प्रयत्न करणार्या टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील दोन सावकारांच्या घरावर सहकार विभागाच्या अधिकार्यांनी छापे घातले. धनपाल निंगाप्पा भमाणे व सदाशिव धनपाल भमाणे अशी सावकारांची नावे आहेत. व्याजाने पैसे देऊन त्या बदल्यात कोट्यवधीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून आले. या दोन सावकारांच्या घरात जमिनी खरेदी केलेले 50 ते 100 रुपयांचे सहा स्टॅम्पपेपर, 9 जमीन खरेदीपत्रे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुका सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
टाकळीवाडी येथील भमाणे बंधू मेंढपाळ आहेत. तसेच ते सावकारी करत असून, कमी पैशांच्या मोबदल्यात शेतकर्यांकडून जमिनीची लुबाडणूक करत आहेत, अशा तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शिरोळ तालुका सहायक निबंधक कार्यालयाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांमध्ये सहकार अधिकारी श्रेणी-1 चे आर. जी. कुलकर्णी, शैलेश शिंदे, संतोष कांबळे, जे. एन. बंडगर, व्ही. व्ही. वाघमारे, पी. व्ही. फडणीस, अजित गोसावी, पांडुरंग खोत यांचा समावेश होता.
एका पथकाने भमाणे यांच्या घराची झडती घेतली. त्यात 21 लाखांचे दस्त मिळून आले. या रकमेत साडेपाच हेक्टर जमीन या सावकारांनी बळजबरीने खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. आता या दोन्ही सावकारांचा जबाब नोंदविण्यात येणार आहेत.
याच गावातील आणखी एक सावकार अजित आम्माण्णा गोरवाडे यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी सहकार खात्याचे पथक गेले होते; पण त्यांचे घर बंद असल्याचे आढळून आले. पथकातील अधिकार्यांनी अधिक चौकशी केली असता गोरवाडे हे सहकुटुंब दक्षिण भारत सहलीला गेल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. गोरवाडे यांच्या घराला सील करण्यात आले आहे.
बळकावलेल्या जमिनीचा तपशील
एक हेक्टर जमीन अवघ्या 9 लाखांत खरेदी केली आहे. सध्या शिरोळ भागात या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. तसेच आणखी एका गरीब व गरजू व्यक्तीकडून 1 हेक्टर 2 गुंठे जमीन 7 लाख 15 हजारांना खरेदी केली आहे. आणखी एकाची एक हेक्टर 18 गुंठे जमीन 4 लाख 50 हजारांना खरेदी केली आहे. तर एकाची 1 गुंठा जमीन 1 लाख 30 हजारांत खरेदी केली आहे. सापडलेल्या कागदपत्रांवरून या दोन सावकारांकडून गोरगरिबांना लुटण्याचा प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.