

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपविरोधात काँग्रेसला वगळून कोणतीही आघाडी यशस्वी होणार नाही. वेगवेगळ्या आघाड्यांना यश येणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र यायला हवं. राहुल गांधींबाबत भाजपने बनवलेली प्रतिमा चुकीची आहे. राहुल गांधींचे नेतृत्व आगामी काळात देशात चमत्कार करेल, असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच अगामी काळात जम्मू काश्मीरमधून निवडणूक लढण्याची शिवसेनेची तयारी आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार राऊत जम्मूमध्ये आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, "राहुल गांधींसोबत १२ किलोमीटर पदयात्रा केली. पदयात्रेत चालणे हे रोमांचकारी आहे. या यात्रेला राजकीय यात्रा म्हणत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे जम्मू काश्मीरसोबत जिव्हाळ्याचे नाते होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आदेशाने जम्मूमध्ये या यात्रेत सहभागी झालो. जम्मूमध्ये काल पोहोचलो तेव्हा आश्चर्य वाटले, केंद्र आणि राज्यातील सरकार बदलले पण १०-१५ वर्षापूर्वींचे प्रश्न आहे तेच आहेत. जम्मू काश्मीर असे राज्य आहे की, येथील छोटा प्रश्नही राष्ट्रीय प्रश्न बनतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३७० कलम हटवल्यानंतर दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी झाली नाही."
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपणार आहे. याबाबत बोलताना राऊत यांनी पक्षाचा प्रमुख कोण असेल हे पक्ष ठरवेल. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि तेच नेतृत्व करतील, असे म्हटले आहे.
हेही वाचा :