Rahul Gandhi | शेतकऱ्यांशिवाय देशाला महत्व नाही

Rahul Gandhi | शेतकऱ्यांशिवाय देशाला महत्व नाही
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड मध्ये पोहोचली आहे. यावेळी भव्य जाहर सभेत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत मुक्तसंवाद साधला तसेच आपल्या भाषणातून भाजपावर टीकेचे वाग्बाण सोडले. यावेळी खासदार शरदचंद्र पवार आणि संजय राऊत देखील उपस्थित होते.

भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधींनी शेतकऱ्यांना 'जीएसटीमधून सुटका करण्याचे आश्वासन दिले आहे. नशिक ही कांद्याची बाजारपेठ असून येथे कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो. मध्यंतरी कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. परंतु त्यावर कोणीही स्पष्ट बोलले नाही. परंतु त्याचवेळी पंतप्रधान मोदी समुद्राच्या तळाशी जातात दर्शन घेतात तसेच विमानाची सैर करतात तेव्हा मात्र त्यांची इंत्यभूत बातमी प्रकाशित केली जाते. महागाई, बेरोजगारीवर चर्चाच होत नाही असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले. सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करुन त्यांचे लक्ष वळविण्याचे प्रयत्न केला जातो आहे. शेतकरी, छोटे उद्योजक, मजदूर, कर्मचारी हे जीएसटी देतात. त्यातून सरकारचा खर्च निघतो. तसेच राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना हात घालत शेतकऱ्यांना जीएसटीमधून बाहेर काढण्यासाठी पूर्णत: प्रयत्न करण्याची ग्वाहीच यावेळी दिली.

उद्योगपतींचे १६ लाख करोडोचे कर्ज माफ केले जाते पण शेतकऱ्यांचे नाही
शेतकऱ्यांच्या प्रश्नासह राहुल गांधी यांनी उद्योगपतींच्या कर्जमाफीवरही टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी सरकारने मागच्या दहा वर्षांत उद्योगपतींचे १६ लाख करोडो रुपयांचे कर्ज माफ केले. हे पैसे किती होतात? हे गरीब भोळ्या शेतकऱ्यांना आकडे सुध्दा माहित नसल्याचे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले. मनरेगाच्या योजनेसाठी वर्षाला ६५ हजार कोटी रुपये लागतात. त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो. उद्योगपतींना माफ केलेले १६ लाख करोडे रुपये जर या योजनेसाठी वापरले असते तर २४ वर्ष ही योजना चालविता आली असती. उद्योगपतींचे १६ लाख करोड रुपये कर्ज माफ केले जाते. परंतु शेतक-यांचा एक रुपया देखील माफ केला जात नाही. तसेच युपीए सरकारच्या काळात "आम्ही ७० कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यातून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र पंतप्रधान मोदी यांनी केवळ काही श्रीमंत धनाढ्य लोकांसाठीच १६ लाख करोड रुपयांची कर्जमाफी केली. देशातील ७० कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती या २० ते २२ धनाढ्य लोकांकडे आहे" असेही त्यांनी सांगितले. २०  ते २२ उद्योजकांचे कर्ज माफ करणे आणि ७० कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही.

शेतकऱ्यांना अडचणीतून काढण्यासाठी सांगितल्या पंचसुत्री उपाय
चारही बाजूंनी शेतकऱ्यांना वेढण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला जात नाही. नुकसान झाल्यावर पिकविमा मिळत नाही. जीएसटी लावला जातो. कर्जमाफी केली जात नाही. जर शेतकऱ्यांना चारही बाजूंनी अडचणीमध्ये वेढणाऱ्या सत्तेतून मुक्त करायचे असल्यास एकच उपाय करुन चालणार नाही. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करावे लागतील. असे सांगून राहुल गांधी यांनी उपाय सांगितले. शेतकरी आहेत तर देश आहे असे राहुल गांधी म्हणाले.

सर्वप्रथम जीएसटीमधून शेतकऱ्यांना बाहेर काढू
पहिला उपाय म्हणजे उद्योगपतींची जर कर्जमाफी करत आहात तर तर शेतकऱ्यांचेही कर्जमाफी व्हायलाच हवी. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कायद्याने अमलात आणाव्या लागतील, पिकविमा योजनेची पुर्नरचना केली जाईल, तसेच शेतकरी जेव्हा कांदा विकण्यासाठी आणतो तेव्हा आयात-निर्यात धोरण बदलून त्याचे उत्पन्न घटविले जाते. आमचे सरकार आल्यानंतर आयात-निर्यात धोरणापासून शेतकऱ्यांचे संरक्षण केले जाईल. शेवटचा आणि पाचवा उपाय म्हणजे जीएसटीमुळे शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे कर लावले जात आहेत. त्यामुळे जीएसटीचा अभ्यास करून शेतकरी जीएसटीमधूनच बाहेर राहिल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. असे राहुल गांधी यांनी सांगितले.

जो व्यक्ती शेतकऱ्यांच्या परीश्रमाचा घामाचा आदर करत नाही, तो शेतकऱ्यांची मदत कधीही करू शकत नाही. आमच्या सरकारचे दरवाजे सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुले असतील. दिल्लीत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकणारे सरकार आहे, हा विश्वास मी देतो. यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरही टीका केली. या योजनेमुळे देशातील सैन्यदल धोक्यात आले आहे. अग्निवीरसाठी पेंशन नसल्याबाबत त्यांनी टीका केली. जवान देशाचे बाॅर्डरवर रक्षण करते तर शेतकरी देशाअंतर्गत रक्षण करते. कारण शेतक-यांशिवाय देशाला महत्व नाही असे राहुल गांधी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news