

ब्रीजटाऊन, वृत्तसंस्था : जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूने सोमवारी आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 30 वर्षीय रहकीम कॉर्नवॉलने (Rahkeem Cornwall) 45 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने 4 चौकार आणि 12 षटकार मारले. यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. या डावात कॉर्नवॉलने 213 च्या स्ट्राईक रेटने 48 चेंडूंत 102 धावा केल्या.
कॅरेबियन प्रीमियर लीगचे सामने सध्या वेस्ट इंडिजमध्ये खेळले जात आहेत. टी-20 लीगच्या चालू हंगामातील 18 व्या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सने सेंट किटस् आणि नेव्हिस पॅट्रियटस्चा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 हून अधिक धावा केल्या. बार्बाडोसचा संघ हा आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचाच संघ आहे.
या सामन्यात सेंट किटस् संघाने प्रथम खेळताना 4 गडी गमावून 220 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 140 किलो रहकीम कॉर्नवॉलने 12 षटकारांसह केवळ आपले शतक पूर्ण केले नाही, तर संघाला विजयापर्यंत नेले. त्यामुळे बार्बाडोस रॉयल्सने 18.1 षटकांत 2 गडी राखून लक्ष्य गाठले.
लक्ष्याचा पाठलाग करताना बार्बाडोस रॉयल्सच्या संघाला रहकीम कॉर्नवॉल आणि कायले मेयर्स यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 4 षटकांत 41 धावा जोडल्या. मेयर्स 13 चेंडूंत 22 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार मारले. यानंतर कॉर्नवॉल आणि लॉरी इव्हान्स यांनी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्या 120 धावांच्या पुढे नेली. इव्हान्स 14 चेंडूंत 24 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर कॉर्नवॉलने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
45 चेंडूंत पूर्ण केले शतक (Rahkeem Cornwall)
30 वर्षीय रहकीम कॉर्नवॉलने 45 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने 4 चौकार आणि 12 षटकार मारले. यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. या डावात कॉर्नवॉलने 213 च्या स्ट्राईक रेटने 48 चेंडूंत 102 धावा केल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलनेही शानदार खेळी केली. तो 26 चेंडूंत 49 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 188 होता. ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. अलिक अथनाजेही 10 चेंडूंत 13 धावा करून नाबाद राहिला. अथनाजेने चौकार मारून विजय मिळवून दिला. संघाने 18.1 षटकांत 223 धावा करत सामना जिंकला. म्हणजे अजून 11 चेंडू शिल्लक होते.