

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने (ICC) यंदाच्या सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू पुरस्कारासाठीच्या नामांकनात चार खेळाडूंच्या नावांचा समावेश केला आहे. आयसीसीने आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटशिवाय भारताकडून रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि न्यूझीलंडचा काईल जेमिसन यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेचेही नाव आहे.
जो रूटने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. इंग्लंड संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी रूटने धावा केल्या. या वर्षी जो रूटने 15 कसोटी सामन्यात 1708 धावा केल्या. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 6 शतके झळकावली. 1700 हून अधिक धावा करणारा तो कसोटी इतिहासातील तिसरा फलंदाज आहे.
भारताच्या आर अश्विनचा (R Ashwin) सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू पुरस्कारासाठीच्या नामांकन यादीत समावेश करण्यात आला आहे. अश्विने त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे ही मजल मारली आहे. या वर्षी अश्विनने 8 सामन्यात 52 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने एका शतकाच्या जोरावर 337 धावा केल्या आहेत. त्याने हे शतक इंग्लंडविरुद्ध ठोकले.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसननेही प्रभावी गोलंदाजी केली आहे. त्याने यावर्षी खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामन्यात 27 विकेट घेतल्या आहेत. त्याने फलंदाजीत 105 धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत जेमिसनने यावर्षी वेगळी छाप सोडली आहे.