पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले; कायम स्मरणात राहील : अमिताभ गुप्ता

पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले; कायम स्मरणात राहील : अमिताभ गुप्ता
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात काम करताना पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले, ते कायम स्मरणात राहील. शहराचा वाढता विस्तार, वाहतुकीचा वाढता ताण, शहराची रचना, अशा अनेक बाबी विचारात घेऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास काम केले. तसेच सायबर गुन्हे लवकर दाखल होण्यासाठी प्रयत्न केले; परंतु सायबर गुन्हेगारीचा विळखा एवढा मोठा आहे, की त्यात आणखी काही करायचे राहून गेले. गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी मोक्का तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केल्याचे मत मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी व्यक्त केले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मंगळवारी रात्री बदली करण्याचे आदेश गृह विभागाने दिले. गुप्ता यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. गुप्ता यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात काम करताना नागरिकांनी सहकार्य केले. गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताचा अनुभव शब्दांत सांगता येत नाही. गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही, असे गुप्ता यांनी सांगितले.

पुणे शहर साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेले आहे. पुणेरी पाट्या आाणि पुणेकरांची उपहासात्मक टीका, याबद्दल ऐकले होते. मात्र, पुण्यात काम करताना कधीही उपहासात्मक टीकेला सामोरे जावे लागले नाही. पुणेकरांनी कायम सहकार्य केले. गुंड टोळ्यांना जरब बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये गुंडांविरोधात कारवाई करण्यात आली. आकडेवारीपेक्षा कारवाईला महत्त्व दिले. गु्न्हेगारी टोळ्यांच्या हालचालीवर सातत्याने करडी नजर ठेवून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस कर्मचारी, अधिकारीवर्गाने मेहनत घेतली, असे त्यांनी सांगितले.

वाहतूक समस्येवर सर्वांनी एकत्र यावे
पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. वाहतूक कोंडीवरून टीका झाली. शहरातील अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे मनुष्यबळ, या बाबी विचारात घेऊन वाहतूकविषयक सुधारणा करण्यात आल्या. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

सखोल तपासाचे समाधान
आरोग्य विभाग भरती, म्हाडा प्रश्नपत्रिका फूट, लष्करी भरती प्रश्नपत्रिका फूट तसेच आभासी चलन प्रकरणातील फसवणूक प्रकरणाचा तपास केला. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला. तपास करताना राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप झाला नाही. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली, असे गुप्ता यांनी नमूद केले.

पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची गरज
पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता मनुष्यबळ अपुरे आहे. पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची निर्मिती व्हायला हवी, असे गुप्ता यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news