पुणे महानगरपालिकेने पाणीबचतीच्या उपाययोजना कराव्यात : अजित पवार

पुणे महानगरपालिकेने पाणीबचतीच्या उपाययोजना कराव्यात : अजित पवार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ४ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे पाणी गळतीच्या उपाययोजना राबवून पाणीबचत करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खडकवासला प्रकल्प तसेच अन्य प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, रवींद्र धंगेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदींसह समितीचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

पिण्यासाठी १५ जुलैपर्यंतचे पाणी राखून ठेवा

सर्व धरणे व इतर पाणीसाठ्यातून पिण्यासाठी १५ जुलैपर्यंतचे पाणी राखून ठेवण्यात यावे असे ठरले असून त्याप्रमाणे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बैठकीत पुणे महानगरपालिकेचा पाणीवापर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणीपट्टी आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेने पाणी बचत करावे, त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाने खालील भागातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार भरणे, कुल यांच्यासह निमंत्रित सदस्यांनी केली. खडकवासला प्रकल्पात १६.१७ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असून सिंचन व बिगर सिंचनासाठी १४.९८ टी.एम.सी. उपलब्ध होत आहे. त्यातून सिंचनासाठी ६.९८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध होत आहे. ४ मार्चपासून पहिले उन्हाळी सिंचनासाठीचे आवर्तन ४५ दिवसांचे सोडण्यात येणार असून दुसरे आवर्तन हे दौंड नगरपालिका आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे.

फुरसुंगीपर्यंत बोगदा करुन कालव्याचे पाणी पुढे नेल्यास मोठी पाणीबचत होणार असून सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने संयुक्तरित्या याबाबत चर्चा करुन तसेच या प्रकल्पासाठी आर्थिक तरतुदीच्या अनुषंगानेही प्रस्ताव तयार करावा, असेही पवार म्हणाले. बैठकीत टेमघर धरणातून होत असलेल्या पाणीगळतीच्या अनुषंगाने ग्राउटींग आणि इतर उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी दौंड नगरपालिका व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी, नवीन मुठा उजवा कालवा, सणसर जोड कालवा, जनाई शिरसाई उपसा सिंचना योजना, मुंढवा जॅकवेलद्वारे पुणे मनपाने उपलब्ध करुन दिलेल्या सांडपाण्याद्वारे जुना मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आदींच्या अनुषंगाने चर्चा झाली.

पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा

पवना व चासकमान प्रकल्पांमध्ये गतवर्षीप्रमाणेच पुरेसा पाणीसाठा आहे. पवना प्रकल्पात ४.८९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत २.९२ टी.एम.सी., औद्योगिक व इतर खासगी संस्थांना ०.४६ टी.एम.सी. असा बिगर सिंचनासाठी देण्यात येणार आहे. सिंचनासाठी उन्हाळी हंगामात ०.२५ टी.एम.सी. पाणी सोडण्यात येणार आहे. चासकमान प्रकल्पातही चासकमान व कळमोडी धरण मिळून एकूण ५.२५ टी.एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यापैकी वहनक्षय, बाष्पीभवन व्यय वगळता उन्हाळी हंगामासाठी ३.६३ टी.एम.सी. पाणी सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध आहे. पिण्यासाठी ०.१३ टी.एम.सी. आणि सिंचनासाठी ३.५ टी.एम.सी. पाणी देण्यात येणार आहे. त्यातून सिंचनासाठी दोन आवर्तने देण्याचे नियोजन असून पहिले उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून ९ एप्रिलपर्यंत तर पुढील आवर्तन १० एप्रिल ते १५ मे किंवा लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे द्यावे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १ टी.एम.सी., सिंचन व बिगर सिंचनासाठी २.०२ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असून जलाशयातून उपसा ०.०७ टी.एम.सी. आणि धरणाच्या खालील नदी व कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांसाठी १.९५ टी.एम.सी. पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भामा व भिमा नदीत पहिले आवर्तन १ मार्च ते १६ मार्च व पुढील आवर्तन २० एप्रिलपासून सोडण्याचे नियोजन असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, श्रीकृष्ण गुंजाळ, शिवाजी जाधव, दिगंबर डुबल व महेश कानेटकर यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पातील पाणीसाठा तसेच नियोजनाची माहिती दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news