पुण्यातील दुसर्‍या टप्प्याच्या उद्‌घाटनासाठी मेट्रो सज्ज; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन?

पुण्यातील दुसर्‍या टप्प्याच्या उद्‌घाटनासाठी मेट्रो सज्ज; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन?
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महामेट्रोचे पुण्यातील दुसर्‍या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, मेट्रो या टप्प्याच्या उद्घाटनासाठी आता सज्ज झाली आहे. महामेट्रोने यापूर्वी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले होते. आता दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटनदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. कारण पुढच्या महिन्यात 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. त्या वेळी पंतप्रधान शहरातील विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार असल्याची चर्चा आहे. यात शहरातील पंतप्रधान आवास योजना आणि मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

मेट्रोचा पहिला टप्पा वनाज ते गरवारे कॉलेज आणि पीसीएमसी ते फुगेवाडीपर्यंतचे काम पूर्ण झाले. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात झाले. आता पहिल्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो धावत असून, प्रवासीदेखील प्रवास करीत आहेत. आता मेट्रोचा दुसरा टप्पा असलेल्या गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर भुयारी मेट्रो स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

प्रशासनाकडून तयारी जोरात…

मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहे. सुरक्षेचे आवश्यक असलेले सीएसएमआर सर्टीफिकीट मिळविण्यासाठीसुध्दा मेट्रोकडून प्रयत्न केले जात आहेत आणि हे सर्टीफिकेट देखील मेट्रोला लवकरच मिळेल. त्यामुळे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वारगेट स्थानकाचे काम 70 टक्के पूर्ण

शहरातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी उभे राहात असलेल्या स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम आता 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. ते तातडीने पूर्ण करण्यासाठी मेट्रोकडून वेगाने प्रयत्न केले जात आहे. स्वारगेट हे ठिकाण शहराचा केंद्रबिंदू असून, त्याला पुण्याचे हृदय म्हणून ओळख आहे. या ठिकाणाहून दिवसभरात लाखो नागरिकांची आणि वाहनांची ये-जा असते. येथेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मोठे स्थानकदेखील आहे. या ठिकाणीच पीएमपीचेसुध्दा पूर्वी मोठे स्थानक होते.

सध्या याच ठिकाणी मेट्रो स्थानक उभारण्यात येत आहे. मात्र, तरीसुध्दा या ठिकाणाहूनच पीएमपीचे सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. या दोन्ही स्थानकांच्या जागांवर मेट्रो प्रशासनाकडून मेट्रोचे भव्य असे व्यावसायिक स्थानक (मल्टि मोडल हब) उभारण्यात येत आहे. ते स्थानक भुयारी असून, वरचे मजले व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचे काम आता पूर्णत्वाकडे येत आहे. पुणेकर नागरिकही आवर्जून कुतुहलाने येथे थांबून या स्थानकाकडे पाहिल्याशिवाय पुढे जात नाहीत. स्वारगेट स्थानकाचे भूमिगत काम सध्या पूर्ण झाले असून, आता एलिव्हेटेड बांधकाम सुरू आहे. चार ते पाच मजल्यांपर्यंतचे एलिव्हेटेड काम पूर्ण होत आले असून, आगामी काळात लवकरच ते पुणेकरांसाठी खुले होईल. हे स्थानक झाल्यानंतर स्वारगेट परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

असे आहे स्थानक

  • पिंपरीकडून भूमिगत मार्गिकेतील शेवटचे स्थानक (भूमिगत)
  • स्थानकाची लांबी ः 180 मीटर
  • रुंदी ः 24 मीटर
  • स्थानकाच्या वरील बाजूस एसटी, पीएमपीचे स्थानक
  • सायकल, रिक्षा, दुचाकी, पादचारी ट्रॅकची व्यवस्था
  • आठ सरकते जिने, लिफ्ट, वातनुकूलित स्थानक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news