

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन-2023 ला रविवारी दुसर्या दिवशी कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार सुट्टी असल्याने पर्यटनास जाण्याचे नियोजन करत अनेकांनी एक्झिबिशनमधील विविध स्टॉल्सला भेट देत सहलींची व पॅकेजची माहिती घेतली. प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सोमवारी (दि. 21) शेवटचा दिवस असून या संधीचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आले आहे.
शनिवारपासून राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील स्मृती भवनमध्ये हे एक्झिबिशन सुरू आहे. एक्झिबिशन पाहण्यासाठी व पर्यटनाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी सकाळपासून रीघ लागली होती. एक्झिबिशनस्थळी सायंकाळी कोल्हापूरकरांची अलोट गर्दी झाली होती. रविवार सुट्टीच्या दिवसाची संधी साधून अनेकांनी सहकुटुंब व सहपरिवार येऊन एक्झिबिशनला भेट दिली. या एक्झिबिशनमध्ये स्थानिक पर्यटन संस्थांसह जगप्रसिद्ध विविध संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे स्टॉल्स आहेत. पर्यटकांना वेगवेगळ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांकडून विविध पॅकेजेसची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी देशातंर्गत पर्यटन आणि परदेशातील पर्यटन याचे नियोजन कसे करता येईल, याची माहिती जाणून घेतली. एकंदरीत कोल्हापूकरांचा सहलीस जाण्यासाठी नियोजन करण्याबाबतचा उत्साह दिसत होता.
बर्याच मुलांना आपल्या कुटुंबीयांना चारधाम यात्रेसारख्या धार्मिक पर्यटनाच्या सहली घडविण्याची इच्छा असते, पण त्यासाठी योग्य ते पर्याय माहीत नसतात. या एक्झिबिशनमुळे अनेकांना त्याची माहिती मिळाली. ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा, धार्मिक ठिकाणे, नवदाम्पत्यासाठी खास हनिमून पॅकेजेस, कृषी पर्यटन, अभ्यास सहली याची माहिती या एक्झिबिशनमधून अनेकांना मिळाली.
अनेकांना आपले आई-वडील, कुटुंबिय यांना परदेशात सहलीसाठी घेऊन जाण्याची इच्छा असते. त्यासाठी करावे लागणार्या गोष्टी माहित नसतात, अशा सर्व पर्यटनप्रेमींसाठी योग्य अशा माहितीचा खजाना पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशनमध्ये उपलब्ध झाला आहे.
विशेष म्हणजे देशातंर्गत तसेच विदेशात सहलीसाठी जाण्याचे अनेक पर्याय आहेत. लोकांना त्यांच्या इच्छेनुसार पर्याय देणार्या बहुसंख्य संस्था या एक्झिबिशनमध्ये आहेत. त्यामुळे ज्यांचे कौटुंबिक किंवा ग्रुपने सहलीला जाण्याचे नियोजन आहे, त्यांनी बुकिंग कसे करावयाचे याची माहिती घेतली. अनेकांनी पुढील तारखा निश्चित करून सहलीला जाण्यासाठी बुकिंगही केले. सहलीस जाणार्यांसाठी कंपन्यांनी डिस्काऊंट ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.
देश विदेशातील सहलींबरोबर पर्यटनाच्या माहितीचा खजाना
या एक्झिबिशनमध्ये पर्यटकांना हिवाळी आणि उन्हाळी पर्यटनासाठीच्या त्यांच्या बजेटमध्ये उत्तम सोयीसुविधा पुरवणार्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांचा समावेश आहे. देश विदेशातील सहलींबरोबर पर्यटनाच्या माहितीचा खजाना या एक्झिबिशनच्या माध्यमातून खुला करण्यात आला आहे. यासंधीचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.