

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) कार्यकारिणी सदस्यपदी दै. 'पुढारी'चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची निवड झाली आहे.
30 सप्टेंबर रोजी 'आयएनएस' संस्थेची 84 वी वार्षिक सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यात 'आज समाज'चे राकेश शर्मा यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली.
सन 2023-24 या वर्षाकरिता निवड झालेल्या अन्य कार्यकारिणीत श्रेयसकुमार मातृभूमी यांची सहअध्यक्ष म्हणून, तर विवेक गुप्ता यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. खजानिसपदी तन्मय महेश्वरी, तर सरचिटणीसपदी मेरी पॉल यांची निवड झाली आहे. 'आयएनएस'च्या कार्यकारी समितीत प्रथमच दै. 'पुढारी' या वृत्त समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे. देशातील विविध वृत्तपत्र समूहांच्या प्रतिनिधींचीही निवड या कार्यकारी समितीवर झाली आहे.
डॉ योगेश जाधव यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. गेली 20 वर्षे डॉ. योगेश जाधव 'पुढारी'चे व्यवस्थापकीय संचालक व समूह संपादक म्हणून काम पाहत आहेत. 2020 साली त्यांची 'पुढारी' समूहाचे चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. 'पुढारी' समूहाने 'पुढारी' या वृत्तपत्रासह रेडिओ, डिजिटल, पुढारी न्यूज चॅनल अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. डॉ. योगेश जाधव यांची निवड देशातील सर्वात मोठ्या 'आयएनएस' संस्थेच्या कार्यकारी समितीत झाल्याबद्दल सर्व क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.