वटपौर्णिमा विशेष : एक अशीही ‘वट माता’!

वट माता
वट माता
Published on
Updated on

वट पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. महाभारतामधील जी काही उपाख्याने आहेत, त्यामध्ये सावित्रीचेही एक उपाख्यान आहे व त्याच्याशी निगडित ही परंपरा आहे. सावित्रीच्या कथेत भारतीय स्त्रीच्या तेजस्वीतेचे देदिप्यमान दर्शन घडते. सावित्रीचे वडील अश्वपती यांनी अपत्यप्राप्तीसाठी दीर्घकाळ तपस्या केली होती. सावित्रीदेवीने कन्याप्राप्तीचा आशीर्वाद दिल्याने ते आनंदून गेले होते. आपल्या कन्येला त्यांनी हवा तसा वर निवडण्याचे स्वातंत्र्यही दिले होते. सध्याच्या कन्याभू्रण हत्येने कलंकित झालेल्या काळात प्राचीन भारतीय संस्कृतीमधील हा पिता किती आदर्श आहे, याची आपण कल्पना करू शकतो. सावित्रीने 'जन्मोजन्मी हाच पती मिळावा' म्हणून प्रयत्न केले नाहीत, तर आपल्या बुद्धीचातुर्य व तपस्येच्या बळाने पतीचे आयुष्य वाढवण्याचे यशस्वी प्रयत्न केले तसेच माहेर व सासरच्या कुळाचा उद्धारही केला. एका वडाच्या झाडाखाली तिने हे सर्व घडवून आणले, असे मानले जाते व त्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जात असते. भारतीय संस्कृतीत 'सर्वं खलु इदं ब—ह्म' हे उपनिषद वचन आहे. त्याचा अर्थ 'हे सर्व काही खरोखरच एक ब—ह्म' आहे. 'नेह नानास्ति किंचन' असेही उपनिषदात म्हटले आहे. वरकरणी अनेक भेद दिसत असले, तरी मुळात किंचितही भेद नाही, असे सांगणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे वृक्षवेली आणि पशुपक्ष्यांनाही आपल्या संस्कृतीत पूज्य स्थान आहे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, कर्नाटकातील एक माता. या मातेने स्वतःच्या पोटच्या अपत्यांप्रमाणे 385 वटवृक्षांचे संगोपन केले आणि ती 'वट माता' झाली!

या 'वट माते'चे नाव आहे, सालुमरदा थिमाक्का. वयाचे शतक पार केलेल्या या वृद्ध मातेला एकेकाळी अपत्यहीन असल्याने लोकांचे टोमणे सहन करावे लागत होते. त्यांच्या पतीचे नाव चिकय्या. हुलिकल या गावातील या दाम्पत्याने झाडांनाच आपले अपत्य मानले व वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करण्यामध्ये स्वतःला झोकून दिले. त्यांच्या गावाजवळ वडाची अनेक झाडे होती. तेथील वडाची रोपे आणून ती महामार्गाच्या बाजूला हुलिकल ते कुडुर यादरम्यान लावण्यास त्यांनी प्रारंभ केला. सुमारे पाच किलोमीटरच्या जागेत महामार्गालगत त्यांनी तब्बल 385 वडाची झाडे लावली व वाढवली. पहिल्या वर्षी त्यांनी दहा झाडे लावली, दुसर्‍या वर्षी पंधरा आणि तिसर्‍या वर्षी वीस झाडे लावली. अशा प्रकारे त्यांनी झाडे लावणे सुरूच ठेवले. या झाडांना पाणी घालण्यासाठी ते चार-पाच किलोमीटर पाणी वाहून नेत असत. जनावरांपासून या झाडांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याभोवती ते काटेरी कुंपणही करीत. पोटच्या पोराचा सांभाळ केल्याप्रमाणे त्यांनी ही झाडे वाढवली. पतीच्या निधनानंतरही थिमाक्कांनी आपला वसा टाकला नाही. त्यांची कीर्तीही सर्वदूर पसरली. कालौघात कर्नाटक सरकारने या झाडांची जबाबदारी स्वीकारली. 2019 मध्ये बागेपल्ली-हालागुरू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ही झाडे कापली जाण्याचा धोका निर्माण झाला होता. थिमाक्कांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती करून हा वृक्षतोडीचा धोका टाळला. त्यामुळे 70 वर्षे जुनी असलेले हे वृक्ष बचावले. थिमाक्कांनी या वृक्षांबरोबरच अन्य आठ हजार झाडेही लावून ती वाढवली आहेत. एका अपत्यहीन स्त्रीचा हा वंश आता वाढतच चालला आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री'ने सन्मानित केले आहे. अन्यही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 'सालुमार्दा' या कानडी शब्दाचा अर्थ होतो एका रांगेत लावलेली झाडे. त्यामुळे या आजीबाईंना 'सालुमार्दा थिमक्का' असेच नाव मिळाले. 'बीबीसी' ने थिमक्का यांचा समावेश जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटकने त्यांना 2020 मध्ये मानद डॉक्टरेट बहाल केली. अमेरिकेतील एका पर्यावरणवादी संस्थेनेही त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरीही तयार करण्यात आली होती. एक अशिक्षित आणि एके काळी लोकांकडून हेटाळणी सहन केलेली ही माऊली आता जगद्विख्यात पर्यावरणवादी स्त्री बनलेली आहे. वटपौर्णिमेनिमित्त या 'वट मातेस' विनम— अभिवादन!

– सचिन बनछोडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news