तापमानवाढीचा तडाखा

तापमानवाढीचा तडाखा
Published on
Updated on

गेल्या दशकभरात ग्लोबल वॉिंर्मंग अर्थात जागतिक तापमानवाढीचा पारा हळूहळू वर सरकत आहे. जागतिक पर्यावरण परिषदांसह अन्य व्यासपीठांवर तापमावाढ कमी करण्याबाबत कितीही चर्चा-मंथन झाले असे तरी तापमानवाढ आजही अनियंत्रित वेगाने होत आहे. पृथ्वीच्या वातावरणात वाढत चाललेली उष्णता शेतकर्‍यांच्या संकटामध्ये वाढ करणारी ठरत आहे. याचा थेट परिणाम शेतातील उत्पादकतेवर होत आहे.

तापमानावाढीचा सामना करण्यासाठी सुनियोजित तयारी आवश्यक आहे. कमी पाणी आणि जास्त तापमान असतानाही चांगले उत्पादन देणार्‍या पर्यायी पिकांचा शेतकर्‍यांना विचार करावा लागणार आहे. किंबहुना ती काळाची गरज बनली आहे. भविष्यातील संभाव्य धोक्यांबद्दल अन्नधान्य उत्पादकांना सतर्क करण्याची गरज आहे, कारण हा मुद्दा लोकसंख्येच्या अन्नसाखळीशीही संबंधित आहे. देशातील प्रत्येक नागरिक वेळोवेळी या संकटाच्या प्रभावाखाली येणार आहे.

जगाच्या तापमानावर लक्ष ठेवणारी जागतिक संस्था डब्ल्यूएमओने अलीकडेच एक अहवाल जारी केला असून, तो जगाची चिंता वाढवणारा आहे; कारण या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या दशकात पृथ्वीचे तापमान कमी-अधिक प्रमाणात सरासरी तापमानापेक्षा जास्त राहिले आहे. चिंतेची बाब म्हणजे चालू वर्षात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2024 मध्येही एल निनोमुळे उष्णता वाढतच राहणार असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. या अहवालानुसार, गेल्या 174 वर्षांत 2023 चा ऑगस्ट महिना हा जगभरात सर्वाधिक उष्ण महिना ठरला होता. अशातच आता यंदाचा उन्हाळाही अंगाची लाही लाही करणार आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, जे मानवी जीवनचक्र आणि पिकांसाठी घातक ठरू शकते.

जून 2023 पासून प्रत्येक महिन्याने नवीन मासिक तापमानाचा विक्रम केला आहे. यामुळे 2023 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदले गेले. सतत वाढत जाणार्‍या या तापमानात अल निनोचाही मोठा वाटा असल्याचे डब्ल्यूएमओचे सरचिटणीस सेलेस्टे साऊलो यांनी म्हटले आहे. जागतिक तापमानातील वाढ संपूर्ण जगाच्या हवामान चक्रावर खोलवर परिणाम करत आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानवाढीच्या संकटामुळे जगभरात कुठे अनपेक्षित पाऊस पडेल आणि कुठे वेदनादायक तापमान वाढेल, हे सांगणे कठीण आहे; मात्र असे असूनही विकसित देशांतील सरकारे या गंभीर संकटाबाबत जागरूक असल्याचे दिसत नाही. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनांवर बंदी घालण्यासाठी जगातील प्रमुख राष्ट्रे बांधील दिसत नाहीत, हे सर्वश्रुत आहे. जगभरातील मोठी राष्ट्रे विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीचे अमानुष शोषण करत आहेत. औद्योगिकीकरणापूर्वीच्या काळाच्या तुलनेत आज जगाच्या तापमानाने निर्धारित मर्यादा ओलांडली आहे, याचे त्यांना गांभीर्य वाटत नाही.

विकसनशील देशांसाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे. सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट ही आहे की, आपण स्वतःला ऋतू बदलांशी त्याच गतीने जुळवून घेऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर हवामानात झपाट्याने होणार्‍या बदलांना अनुसरून आपल्याला आपल्या शेतीच्या पद्धतीही बदलण्याची गरज आहे. कमी पाऊस आणि जास्त तापमानात योग्य उत्पादन देणार्‍या पारंपारिक पिकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. एक काळ असा होता, जेव्हा आपण भारतात मोठ्या भागात भरड धान्याचे उत्पादन करायचो, जे कमी पावसातही चांगले उत्पादन व उत्पन्न देऊ शकत होते; परंतु कालांतराने अधिक पाणी लागणारी पिके घेण्यास सुरुवात केली. हवामानातील बदलांचा परिणाम केवळ अन्नधान्यावरच नाही, तर भाजीपाला, फळे आणि फुलांवरही होत आहे. अशा परिस्थितीत केवळ कागदोपत्री काम न करता जमिनीवर ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news