

मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून श्री वीरशैव बसवेश्वरांची ओळख अवघ्या देशाला आहे. बसवेश्वर हे गरिबांचे कैवारी होते. समता हे तत्त्व त्यांच्या धर्मप्रसाराचे प्रमुख सूत्र आहे. आपण जे कमवतो त्यात ईश्वराचा वाटा आहे. म्हणून त्यातील दीन-दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला होता.
महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला संत परंपरेचा थोर वारसा लाभला आहे. भारतामध्ये समाजसुधारणेच्या कार्यात या संतांचे मोलाचे योगदान आहे. त्या काळच्या जुन्या रूढी-परंपरांमध्ये, बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये अडकलेल्या समाजाला नवी वैचारिक दिशा देण्याचे काम या संतांनी केले. या संत परंपरेमधील एक महान संत म्हणजे महात्मा बसवेश्वर. मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून श्री वीरशैव बसवेश्वरांची ओळख अवघ्या देशाला आहे. इ.स. 1131 ते 1167 या काळात बसवेश्वरांनी समाज परिवर्तनवादी विचारांची पताका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात बिंबवण्याचे कार्य केले. महात्मा बसवेश्वर हे कृतिशील क्रांतिकारक होते. त्यांचा सामाजिक समतेवर विश्वास होता. त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव, उन्नती, हक्क, जातिभेद, सामुदायिक विवाह, समाजात अस्पृश्यता, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य, सर्वांगीण विकास क्षेत्रात उन्नती यांचा अंगीकार केला होता. त्यांचा बालविवाहास विरोध होता आणि विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांनी मान्यता दिली. देवालयापेक्षा देहालयाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारे संत म्हणून महात्मा बसवेश्वरांकडे पाहिले जाते. आज एकविसाव्या शतकातले समाजचित्र पाहताना बसवेश्वरांच्या तत्त्वांचे पालन करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होते. प्रामाणिकपणे धनसंपत्ती कमविणे, जास्तीची संपत्ती गुरू, लिंग व जंगम यांच्या सेवेसाठी खर्च करणे ही त्यांनी दिलेली काही प्रमुख तत्त्वे होती. श्रम हाच खरा स्वर्ग हे त्यांचे प्रसिद्ध वचन होते. मानवी उन्नतीचा मार्ग श्रम होय, ही धारणा समाजाच्या गळी उतरविण्याचे कार्य श्री बसवेश्वरांनी केले.
बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावी 1105 मध्ये झाला. वडिलांचे नाव मादरस तर आईचे नाव मादलांबा. बसवेश्वरांचे वडील विज्ञान पंडित होते. वयाच्या 8 व्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे, असे म्हणून बसवेश्वरांनी मुंज करून घेण्याचे नाकारले होते. ज्ञानप्राप्तीच्या शोधासाठी त्यांनी घराचा त्याग केला. कृष्णा आणि तिची उपनदी मलप्रभा यांच्या संगमावर वसलेले कुंडलसंगम येथे ते गेले. कुंडलसंगमचे कुलपती जातवेदमुनी (ईशान्यगुरू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 12 वर्षे वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान, वेद-वेदांतांचे अध्ययन केले. ते नंतर कुंडलसंगम सोडून कल्याण येथे गेले. समाजसेवेच्या प्रचारासाठी लिंगायत धर्माची पंचाचार्यांकडून ईष्ट लिंग दीक्षा घेतल्यामुळेच त्यांना वीरशैव हे नाव प्राप्त झाले.
बसवेश्वर हे शिवभक्त होते. शिव हा एकमेव ईश्वर मानून त्यांनी वीरशैव या नावाने संप्रदाय पुनरुज्जीवित व संघटित करून धर्मसुधारणेचे कार्य केले. इष्टलिंग हे अंत:करणातल्या निर्गुण निराकार शिवाचे प्रतीक आहे, असे ते मानत असत. इष्टलिंगाच्या पूजेबरोबरच माणुसकी, दया, क्षमा, शांती, समता, सत्य, करुणा, शील आणि सौजन्य आदी सद्गुण आचारणात आणले तरच शिवाची पूजा होईल, असे ते म्हणत. गळ्यात रुद्राक्ष, चांदीचे लिंग आणि कपाळी भस्म धारण करतो तो वीरशैव होतो, अशी त्यांची विचारधारा होती. जंगमभक्ती अर्थात समाजसेवा केल्याशिवाय तन, मन, धन अर्पण केल्याशिवाय केवळ लिंगभक्ती करणे निरर्थक आहे. बसवप्रज्ञा म्हणजे जातीभेद, लिंगभेद, वर्गभेद आणि कुळभेद हे सारे मिटवणे व मानव धर्माचा स्वीकार करणे, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणे, अहंकाराचा नाश करणे ही त्यांची प्रतिज्ञा होती. बसवेश्वर हे गरिबांचे कैवारी होते. आपली संपत्ती लोकसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरविले होते. समता हे तत्त्व त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र आहे. आपण जे कमवतो त्यात ईश्वराचा वाटा आहे. म्हणून त्यातील दीन-दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला होता.
– बसवराज शिखरे