दि. 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिवस साजरा केला जाईल. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व समजावे यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. बंगळूरमध्येही हा दिवस साजरा केला जात असेल आणि यावर्षीही साजरा होईल. मात्र यावेळी स्थानिक नागरिक पाण्याचा धडा बर्यापैकी शिकलेले असतील. टेक्नॉलॉजी सेक्टरच्या कंपन्यांचा बंगळूर गड मानला जातो. आज टेक्नॉलॉजीचा अर्थ डेटा आहे. त्यामुळे या शहरातील आणि अन्य टेक शहरांतील आयटी कंपन्यांचे कर्मचारी हे 'डेटा' म्हणजे माहितीच्या जंजाळात जागतात आणि झोपतात. वास्तविक डेटाशी प्रेमच नाही, तर त्याच्याशी साता जन्माची गाठही बांधली गेली आहे. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा पीसी हे नव्या काळातील जोडीदार आहेत. डेटाशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे. डेटाची तहान भागतच नाही; मात्र डेटाचीही स्वत:ची तहान आहे, ही बाब अनेकांना ठाऊक असेलच असे नाही. डेटाला पाणी हवे असते आणि तेही भरपूर. कधी कधी नदीएवढे. पाणी वाचवणे म्हणजे केवळ नळ बंद करणे नव्हे; कारण तोच एकमेव उपाय आपल्याला ठाऊक होता. एक लक्षात घ्या, मोबाईल, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर व्हॉट्स अॅप, गुगल, फेसबुक वापरत असताना दुसरीकडे नकळतपणे पाण्याचादेखील खर्च होत आहे.