युक्रेन युद्धामुळे चीनचे उखळ पांढरे!

युक्रेन युद्धामुळे चीनचे उखळ पांढरे!
Published on
Updated on

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटके बसले असले तरी या युद्धामुळे चीनचे उखळ पांढरे झाले आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जपान अणि पश्चिमी देशातील कंपन्यांनी रशियातून गाशा गुंडाळला. पण गेल्या वर्षभरात रशियामध्ये चिनी मोटारींची निर्यात पाचशे पटींनी वाढली आहे. ही गोष्ट केवळ मोटारीपुरतीच मर्यादित नाही तर चीन आता रशियाचा सर्वात मोठा औद्योगिक भागीदार बनला आहे. अशा प्रकारे भरभक्कम व्यापारी सहकार्य मजबूत करण्यास केवळ पश्चिमी देशातील निर्बंधांनी हातभार लावला नाही तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे व्यक्तिगत समीकरणही तितकेच महत्त्वाचे राहिले.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले त्याला लवकरच दोन वर्षे होत आहेत. फेब-ुवारी 2022 मध्ये रशियाने हल्लाबोल केला आणि कोरोना काळातून बाहेर पडणारे जग पुन्हा आर्थिक संकटात सापडले. परिणामी रशियावर बहिष्कार तंत्र सुरू झाले आणि एक एक कंपन्या रशियातून निघून जाऊ लागल्या. या संधीचा लाभ घेत चीनने रशियात बस्तान मांडले असून तो आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. युद्धाच्या काळात रशियाला एका प्रबळ साथीदाराची गरज होती आणि ती काही अंशी चीनने भरून काढली आहे. अनेक वर्षे मॉस्कोच्या एका प्रमुख भागात माझदा नावाची एक इमारत असायची. पण युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जपान अणि पश्चिमी देशातील कंपन्यांनी रशियातून गाशा गुंडाळला.

आता माझदा नाव असलेल्या इमारतीत चीनची मोटार कंपनी चेरीची डीलरशिप सुरू झाली आहे. याप्रमाणे ऑडीच्या काही शोरूममध्ये चीनची गिली, हॅवेल आदी कंपन्यांच्या डीलरशिप सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात रशियामध्ये चिनी मोटारींची निर्यात पाचशे पटींनी वाढली आहे. ही गोष्ट केवळ मोटारीपुरतीच मर्यादित नाही; तर चीन आता रशियाचा सर्वात मोठा औद्योगिक भागीदार बनला आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाच्या आयातीच्या तुलनेत चीनची आयात 20 टक्क्यांनी वाढली आहे. अशा प्रकारे भरभक्कम व्यापारी सहकार्य मजबूत करण्यास केवळ पश्चिमी देशातील निर्बंधांनी हातभार लावला नाही तर रशियाचे अध्यक्ष व पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे व्यक्तिगत समीकरणही तितकेच महत्त्वाचे राहिले. 2014 मध्ये उभयांतील संबंध हे बरोबरीच्या उद्देशातून प्रस्थापित झाले असले तरी आज या संबंधाला मैत्रीचे रूप आले असून ती सक्षम दिसत आहे.

या युतीमध्ये एका बाजूला चीन हा मजबूत पक्ष म्हणून उभा आहे; तर दुसरीकडे रशिया हा ज्युनिअर भागीदार आहे. काही दिवसांपूर्वी चीनने एक राजनैतिक नकाशा प्रकाशित केला. त्यात भारत, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेशिया, नेपाळ, भूतानचा काही भाग आणि तैवानचा भाग हा चीनच्या हद्दीत दाखविला आहे. मात्र यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनने रशियाच्या बलशोई उसुरियस्की बेटालाही आपलाच अविभाज्य भाग मानले आहे. विशेष म्हणजे चीन आणि रशियाने हा वाद 2005 मध्ये मिटवला आणि संघर्षाचे मूळ असलेल्या या भागाची वाटणी 2008 पर्यंत पूर्ण केली. तरीही नव्या नकाशात जिनपिंग यांनी संपूर्ण भागावर चीनचाच दावा सांगितला आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ओबामा यांनी म्हटले होते, चीन हा वाहत्या वार्‍याचा सतत अंदाज घेत राहील आणि जोपर्यंत त्याला अडवत नाही, तोपर्यंत तो विस्तार करत राहील. याच बळावर चीनने रशियाच्या प्रतिसादाचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. त्याने एकच संदेश दिला की, भविष्यात कोणाच्या निर्णयाचे अधिराज्य राहील. अर्थात रशियाने नकाशा फेटाळून लावला होता.

मात्र या मुद्द्यावर तो कोणत्याही प्रकारचा विरोध करू शकला नाही. त्यामुळे रशिया आणि चीन यांच्यातील संबंधात 'दादा' कोण आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करणार्‍या जिनपिंग यांच्या दाव्याला एकप्रकारे बळ मिळाले. मात्र 2014 मध्ये सुरू झालेल्या या संबंधात खोडा घालण्याच्या द़ृष्टीने अध्यक्ष पुतीन यांना बाजूला करण्याची पश्चिम देशाची रणनीती काम करत होती. पण अलीकडच्या नव्या घटनाक्रमात पुतीन यांच्याविरुद्ध एक आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी करण्यात आले आणि त्यामुळे या वॉरंटने रशियाच्या अध्यक्षाला चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिटिव्हच्या संमेलनाच्या व्यासपीठावर ढकलण्याचे काम केले. हा चीनचा अब्जावधी डॉलरची गुंतवणूक असणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचा उद्देश अनेक शतकानंतर एक नवीन सिल्क रूट तयार करण्याचा आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला करताच चीनने रशियाच्या गुपचुप पावलांचे स्वागत केले. कारण रशियाला आता चीनशिवाय पर्याय नाही, हे जिनपिंग यांना चांगलेच ठाऊक होते. हाच तो काळ होता की, जेव्हा वास्तविकरीत्या चीनची उंची आणि शक्ती वाढली. दुसरीकडे तो रशियाचा मोठा भागीदार बनला. चीनबरोबर रशियाचा व्यापार हा 2017 च्या 90 अब्ज डॉलरवरून 2022 मध्ये 190 अब्ज डॉलरवर पोचला. मात्र यावर्षी यात 40 टक्के वाढ दिसली. चीनच्या वस्तू आता रशियात सर्वत्र मिळतात. त्याचवेळी रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्तात तेल अणि नैसर्गिक गॅस खरेदी करण्यात चीन यशस्वी ठरले. मात्र चीनसाठी मोठी बातमी म्हणजे पश्चिम जगाने चीनच्या युआनला जगातील महत्त्वाचे चलन करण्यात अनेक बाजूंनी मदत केली आहे.

रशियाशी चीनची असणारी जवळीक ही पश्चिम देशांना आवडलेली नाही. पश्चिमी जगातील देश चीनमधील गुंतवणूक कमी करत आहेत आणि पर्यायी पुरवठा साखळी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीन हा युक्रेनचे सार्वभौमत्व अबाधित राहावे असे म्हणत असला तरी रशियाशी दोस्ती वाढतच चालली आहे. त्यामुळे अमेरिकेने बिचकून राहिले पाहिजे. भारताचा विचार केल्यास चीन हा बाजूलाच बसला आहे आणि अलीकडच्या काळात आपापसातील गुप्त माहिती शेअर करणारे 'फाईव्ह आईज' म्हणजेच पाच देशांसमवेतच्या संबंधात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. भारताला मोठे काम करायचे आहे अणि अशा लाटा पार करण्यासाठी त्याला खर्‍या राजकीय नेतृत्वाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news