लाल चिखल!

लाल चिखल!
Published on
Updated on

कांद्याच्या दरवाढीमुळे सत्ता गमावावी लागल्याचे उदाहरण देशाच्या इतिहासात आहे, तेव्हापासून कांद्याचे दर वाढले की, केंद्र सरकार लगेच पावले उचलते आणि ते नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसते. सत्ताधारी पक्षाच्या शाखा ठिकठिकाणी दुकाने मांडून कांदा स्वस्तात उपलब्ध करून देतात. कांदा डोळ्यातून नुसता पाणी काढत नाही, तर सत्ताधार्‍यांना रस्त्यावर आणून 'वेलकम' चित्रपटातील नाना पाटेकरप्रमाणे 'आलू ले लो, कांदा ले लो' अशा आरोळ्या द्यायला लावतो. कांद्याच्या दरवाढीची आठवण करून देणारी परिस्थिती सध्या देशभरात टोमॅटोने निर्माण केली आहे.

किरकोळ बाजारात दीडशे रुपये किलोपर्यंत पोहोचलेला टोमॅटो सर्वसामान्य माणसाच्या जेवणातून कधीच बाहेर फेकला गेला आहे. एवढेच नव्हे, तर बड्या-बड्या हॉटेलांमधूनही टोमॅटोशी संबंधित पदार्थ हद्दपार होतो आहे. तरुण पिढीची पसंती असलेल्या काही साखळी रेस्टारंटमधून टोमॅटोला सुट्टी देण्यात आली आहे. वाढलेल्या किमतीमुळे या कंपन्यांनी टोमॅटो खरेदी बंद केली असून त्यांच्या बर्गर आदी पदार्थांतूनही तो बाहेर गेला. टोमॅटो हे हंगामी पीक असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. एकूण या दरवाढीचे सामान्य माणसांच्या स्वयंपाकघरापासून बड्या साखळी हॉटेलांपर्यंत कसे परिणाम झाले, हेच या उदाहरणांवरून दिसून येते.

सर्वसामान्य माणसाची दोन घासांसाठी रोजची लढाई असल्याने त्याला या टोमॅटोच्या दरवाढीचे फारसे कौतुक नसले, तरी ही दरवाढ विविध समाजघटकांवर कुठे ना कुठे परिणाम करत असतेच. मध्यमवर्गीयांकडून नेहमीप्रमाणे टोमॅटोच्या दरवाढीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, हे सगळे होत असताना तीन आठवड्यांपूर्वी पाच रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो अचानक एवढा का वधारला, याचा विचार कुणी करताना दिसत नाही. ज्यावेळी टोमॅटो मातीमोल भावाने विकला जातो, तेव्हा शेतकरी देशोधडीला लागत असतो. मग, असे दर आभाळाला भिडतात तेव्हा त्याच्या नुकसानीची भरपाई होते का, याचेही विश्लेषण कुणी करताना दिसत नाहीत.

ख्यातनाम साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची 'लाल चिखल' नावाची प्रसिद्ध कथा आहे. घाम गाळून शेती पिकवलेला शेतकरी टोमॅटो बाजारात विकायला घेऊन जातो, तिथे कवडीमोल दराने गिर्‍हाईक टोमॅटोची मागणी करते तेव्हा तो शेतकरी उद्विग्न होऊन टोमॅटो विकायचेच नाकारतो आणि त्यावर थयथया नाचून टोमॅटोचा चिखल करतो, असा या कथेचा आशय. शेतकर्‍याची वेदना प्रत्ययकारीपणे त्यांनी या कथेतून मांडली आहे. अलीकडच्या काळात दर पडल्याने बाजारात नेऊन विकणे परवडत नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर ओतून दिल्याच्या अनेक घटना आहेत. त्या परिस्थितीकडे तटस्थपणे पाहणारा मध्यमवर्ग दरवाढ झाल्यावर मात्र आकांडतांडव करताना दिसतो. त्याच वर्गासाठी देशभरातील बाजारपेठांतून टोमॅटो खरेदी करून परवडणार्‍या दरात विकण्याची वेळ सरकारवर आली.

या सर्व परिस्थितीमध्ये एकच प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचे कुतूहल अनेकांच्या मनामध्ये आहे, ते म्हणजे दरवाढीचा फायदा शेतकर्‍यांना झाला का किंवा किती प्रमाणात झाला? कारण, अन्य पिकांबाबतीत असे आढळून येते की, नुकसान होते तेव्हा ते शेतकर्‍याचे होत असते. परंतु, फायदा होतो तेव्हा तो सगळा दलालांचा होत असतो. शेतकरी नामानिराळाच राहतो. आतासुद्धा असा प्रश्न विचारला जात आहे.

'टोमॅटो उत्पादक मालामाल', 'टोमॅटोने शेतकर्‍यांना केले लखपती' अशा बातम्या व्हायरल होत आहेत आणि लाल टोमॅटोचे गुलाबी चित्र दाखवले जात आहे. यासंदर्भातील वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी वर्षभराचा आढावा घ्यावा लागतो आणि त्यातून शेतकर्‍यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचेच दिसून येते. वर्षभरातील पहिल्या हंगामात एक किलो टोमॅटोला 10 ते 15 रुपये भाव मिळाला. दुसर्‍या हंगामातील भाव 5 ते 10 रुपये होता. शेतीच्या फायद्या-तोट्याचे गणित बाजारात मिळणार्‍या दरावर नव्हे, तर पिकासाठी येणारा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर या गणितावर अवलंबून असते. एक किलो टोमॅटोचा उत्पादन खर्च सरासरी 13 रुपयांपर्यंत येतो. तो बाजारात नेऊन विकण्यापर्यंतचा खर्च धरल्यास विक्रीपर्यंत किलोला 16 ते 17 रुपये खर्च येतो, असे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येते. याचाच अर्थ आधीच्या दोन्ही हंगामांत शेतकर्‍यांना तोटाच सहन करावा लागला.

आधीच्या दोन्ही हंगामांत तोटा झाल्याने शेतकर्‍यांनी टोमॅटोची लागवड कमी केली. बाजारात आवक कमी झाल्याने दर वाढले. एप्रिल महिन्यापासून उष्णतेची लाट सुरू झाली आणि वातावरणात मोठे बदल झाले. अन्य भाजीपाल्यासह टोमॅटो पिकालाही त्याचा फटका बसला. जून महिन्यात पावसाने ओढ दिली आणि चालू हंगामात 20 जूननंतर दरात अचानक वाढ झाली. शेतकरी दरवर्षी टोमॅटोचे तीन हंगाम घेत असतात. पहिल्या दोन हंगामांत नुकसान झाल्यामुळे तिसर्‍या हंगामात लागवड कमी झाली. हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार या राज्यांतूनही शेतकर्‍यांनी या पिकाकडे पाठ फिरवली. त्याचा एकूण परिणाम बाजारावर झाला.

एकरी सरासरी उत्पादन आणि तिन्ही हंगामांत मिळालेला दर याचे गणित केल्यावर किलोला 17 ते 20 रुपये भाव मिळाला; मात्र ज्या शेतकर्‍यांनी चालू हंगामात टोमॅटो पन्नास ते साठ रुपयांनी विकला, त्याच शेतकर्‍यांना हा दर मिळाला, ज्यातून त्यांचा जेमतेम उत्पादन खर्च निघाला. ज्यांनी तिसरा हंगाम घेतला नाही त्यांना पहिल्या दोन्ही हंगामांत जबर नुकसानच सहन करावे लागले. शेतीमालाला भाव मिळणे आणि शेतकर्‍याचा फायदा होणे याचा सध्याच्या व्यवस्थेत अर्थाअर्थी संबंध नाही. ही स्थिती सुधारून जेव्हा शेतकर्‍याला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळेल किंवा बाजारातला थेट फायदा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होईल, तेव्हाच शेतकर्‍यांना बरे दिवस येतील. अन्यथा शेतकर्‍यांच्या नशिबी 'लाल चिखल'च राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news