चीनच्या कुरापतींकडे लक्ष हवे

चीनच्या कुरापतींकडे लक्ष हवे
Published on
Updated on

युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू असताना आणि रशियाने पाश्चात्त्य देशांविरुद्ध अण्वस्त्रांच्या सरावाची घोषणा केलेली असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे फ्रान्स, सर्बिया आणि हंगेरी या तीन युरोपियन देशांना भेट देत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी फ्रान्सकडून सहकार्य मिळवणे हा चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या या भेटीचा एक उद्देश आहे.

शी जिनपिंग यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या भेटीत रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दा उपस्थित केला. एकेकाळी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना चीनची मदत हवी होती. चीनने रशियाला शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी उपकरणे पुरवल्याने फ्रान्स नाराज आहे. रशियाच्या पाठीशी उभे राहिल्याने युरोपमध्ये चीनची प्रतिमा नकारात्मक बनली आहे. दुसरीकडे जिनपिंग यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत आणि फ्रान्समधील मैत्री शिगेला पोहोचली आहे. सध्या रशियानंतर फ्रान्स हा भारताचा सर्वांत जवळचा युरोपियन मित्र देश आहे. त्यामुळेच चीन फ्रान्सला आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे लक्षात घेता भारताने सतर्क राहण्याची गरज आहे.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या या भेटीचा दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे युरोपमध्ये चीनविरुद्ध सुरू असलेला तणाव संपवणे. फ्रान्स हे युरोपचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे शी जिनपिंग यांनी फ्रान्स-चीन राजनैतिक संबंधांना 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पॅरिसला भेट दिली. युरोपमध्ये चीनबाबत तणाव वाढला आहे. युरोपियन युनियनने गेल्या आठवड्यातच चीनच्या विंड टर्बाइन आणि वैद्यकीय उपकरणांची तपासणी सुरू केली आहे. एवढेच नाही, तर चीनची सुरक्षा उपकरणे बनवणारी कंपनी नूकटेकच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. चीनबाबत सकारात्मक आणि व्यावहारिक धोरणे आखण्यासाठी युरोपियन युनियनला मदत करण्याचे आवाहन चीनने फ्रान्सला केले आहे. जिनपिंग यांना वाटते की, युरोपमधील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी फ्रान्स चीनला मदत करू शकेल. यादरम्यान चीन भारतालाही लक्ष्य करत आहे. याचे कारण अलीकडेच फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. भारताने फ्रान्सकडून राफेल जेट, स्कॉर्पिन पाणबुडी, हेलिकॉप्टर आणि अनेक मारक क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत.

जुलै 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला भेट दिली होती आणि त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारताला भेट दिली. मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. भारत आणि फ्रान्स मिळून आर्मेनियाला मदत करत आहेत. फ्रान्सने पंतप्रधान मोदीं यांना ग्रेट क्रॉस ऑफ द लेगिआनफ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यावरून फ्रान्स भारतासोबतच्या संबंधांना किती महत्त्व देत आहे हे दिसून येते. भारताच्या शेजारी देशांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून भारताच्या सीमेवरील तणाव वाढवणे ही चीनची रणनीती आहे. त्यानुसार चीनने नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान,श्रीलंका, मालदीव आणि म्यानमार या देशांशी आपले संबंध दृढ केले आहेत. आता चीनची नजर युरोपवर आहे.

भारताचे युरोपातील सर्व देशांशी जवळचे संबंध आहेत. भारत आणि युरोपियन देश हे नैसर्गिक मित्रदेश आहेत, याउलट युरोपमध्ये चीनची प्रतिमा खराब आहे. फ्रान्समधील तिबेटी गटाने चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात आंदोलन सुरू करून, या दौर्‍याला विरोध व्यक्त केला आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा हा फ्रान्स दौरा धोरणात्मक मानला जात असल्याने भारताने, कूटनीतीच्या द़ृष्टिकोनातून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महासता होण्याच्या निर्धाराने वाटचाल करत असलेल्या चीनने अनेक देशांना अब्जावधी डॉलरचे कर्ज देऊन त्यांना आपले मांडलिक बनवले आहे. हिंदी महासागरात आपला दबाव निर्माण करण्यासाठी नाविक तळ उभे केले आहेत. कोणतीही गोष्ट करताना चीन आपल्या स्वार्थाचा विचार करत असतो. त्यामुळे एकूणच भारताने चीनबाबत सावधानता बाळगण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news