आंतरराष्ट्रीय : धुमसता बांगला देश
पंतप्रधान शेख हसीना यांची बांगला देशच्या राजकारणावर चांगलीच पकड आहे. चिनी कर्जविळख्यात अडकण्यापासून नेहमीच बांगला देशचा बचाव होईल, अशी भूमिका त्यांनी घेतली. चीन आणि भारत संबंधांमध्ये हसीना यांनी नेहमीच भारताला झुकते माप दिले आहे. बांगला देशचा विकासरथ योग्य वाटेवर धावत असताना तेथे अचानक संघर्षमय स्थिती का ओढवली?
बांगला देशात गेल्या आठवड्यात अचानक दीड लाख लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हंगामी सरकारकडे पंतप्रधानांनी सत्ता सोपवावी या मागणीसाठी जोरदार निदर्शने सुरू केली. त्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या दोन गटांमध्ये तुंबळ धुमश्चक्री होऊन अनेक लोक जखमीही झाले. या घटनेमुळे बांगला देशामध्ये श्रीलंकेसारखी अराजक परिस्थिती उद्भवते की काय, अशा शक्यता व्यक्त होऊ लागल्या. वस्तुतः या घटनेचा अन्वयार्थ लावायचा झाल्यास थोडेसे मागे वळून तेथील राजकीय जीवनाचा आणि हालचालींचा अभ्यास करावा लागेल. बांगला देश हा सत्ताधारी अवामी लीग आणि बांगला देश नॅशलिस्ट पार्टी या दोन गटांमध्ये विभागलेला आहे.
या दोन मुख्य पक्षांभोवती अनेक उपपक्ष त्यांच्या गटामध्ये असतात. त्यातून आघाडीचे राजकारण गतिमान होते. मागील वेळी 14 पक्षांची आघाडी तयार करून सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बहुमत मिळवले होते. त्यांची बांगला देशच्या राजकारणावर चांगलीच पकड आहे. त्या चारवेळा पंतप्रधान राहिल्या आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी बांगला देशच नव्हे तर सबंध दक्षिण आशियावर आणि जगावर ठसा उमटविला आहे. 'फोर्ब्ज' मासिकाने त्यांचा एक शक्तिशाली महिला म्हणून शंभर प्रभावशाली व्यक्तीमध्ये समावेश केला आहे. 'टाईम' मासिकानेही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. हसीना यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता त्यांनी मिळवलेले यश हे अनन्यसाधारणच म्हटले पाहिजे.
थोडा पूर्वेतिहास
वंग बंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या त्या कन्या. शेख मुजीबूर यांचा मोठा दबदबा होता. कारण त्यांनी पाकिस्तानच्या शोषणाविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा दिला. भारतामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांनी त्यांच्या मुक्ती वाहिनीस पाठिंबा दिला. भारताने लष्करी कारवाईस मदत केली आणि 1971 मध्ये बांगला देश मुक्त झाला. बांगला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याचे नेतृत्व शेख मुजीबूर रेहमान यांच्याकडे होते. त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने स्वतंत्र राष्ट्राची उभारणी केली आणि तसा भक्कम पायाही घातला. परंतु त्यांचे राजकारण प्रभावशाली असताना त्यांची हत्या झाली आणि बांगला देश दुष्टचक्रामध्ये सापडला. त्यानंतर काही काळ तेथे अस्थिरता कायम होती. जनरल इर्शाद या लष्करी नेत्याने त्यांच्या हातून सत्ता घेतली आणि पाच वर्षे चालवली. या काळामध्ये शेख हसीना जर्मनीत गेलेल्या होत्या. त्या आणि त्यांच्या दोन कन्या यांच्यासह त्यांनी जर्मनीतील दूतावासात मुक्काम केला.
पुढे त्या भारतात आश्रयासाठी दिल्लीमध्ये पाच वर्षे अज्ञातवासात राहिल्या. पाच वर्षांनंतर त्यांनी दिल्लीतून बांगला देशात पुनरागमन केले. त्यानंतर आपले राजकीय सामर्थ्य जोपासण्यास सुरुवात केली. वडिलांनी स्थापन केलेल्या अवामी लीग या पक्षाला त्यांनी झुंजारपणे नेतृत्व दिले आणि पक्षातील तरुण नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्षाची बांधणी केली. बांगला देशसारख्या देशामध्ये लोकशाही रुजवणे सोपे नव्हते. कारण मुळातच लोकांची प्रवृत्ती मूलतत्त्ववादी आणि धार्मिक होती. अशा वेळी उदार, धर्मनिरपेक्ष तत्त्व घेऊन पक्ष चालवणे आव्हानात्मक होते. पण हसीना यांनी उदारमतवादी लोकशाही राजकारण उचलून धरून बांगला देशला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी फार मोठा संघर्ष केला.
बेगम खालिदा झिया पंतप्रधान होत्या तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना त्यांनी संसदीय जीवनातील लोकशाही परंपरा समृद्ध केल्या. आपल्या देशाच्या हितासाठी ध्येयधोरणे कशी असावीत त्याचा अभ्यास केला. या काळात आपल्या देशाला कशाची गरज आहे, कोणत्या क्षेत्रात आम्ही मागे आहोत, कोणत्या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचे आहे. उद्योग, शिक्षण, प्रगत विज्ञान तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचे अनेक आराखडे त्यांनी आपल्या मनामध्ये बांधले आणि सत्ता हातात घेतल्यानंतर नंतर ते आराखडे प्रत्यक्ष कृतीमध्ये आणले. त्यांचे पती हे अणुशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडूनही त्यांना बराच वारसा मिळाला. तुरुंगवासात असताना आणि मुक्ततेनंतर त्यांनी केलेले कार्य खरोखरच महत्त्वाचे आहे. लष्करी उठावाच्या काळातसुद्धा त्यांना फार मोठा त्रास झाला. पण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करत करत आपले नेतृत्व विकसित केले आणि प्रभावीपणे इतिहासावर ठसा उमटवला.
विकासाची बैठक
त्यांनी बांगला देशला आपल्या पहिल्या आणि दुसर्या पंतप्रधानपदाच्या काळात खूप चांगली विकासात्मक बैठक प्राप्त करून दिली. त्यांनी बांगला देशमध्ये अनेक मौलिक सुधारणा घडवल्या. शेतीमध्ये सिंचनाचे प्रश्न होते ते सोडविले. भारताबरोबर नदी पाणीवाटपाचे वर्षानुवर्षे रेंगाळत राहिलेले वाद त्यांच्या काळात सोडवण्यात आले. त्यांनी बांगला देशला प्रगत विज्ञान तंत्रज्ञानाची बैठक प्राप्त करून दिली. शिक्षणाच्या सुविधा प्राप्त करून दिल्या.
महिलांच्या विकासासाठी संधी प्राप्त करून दिली. बांगला देश मायक्रो बँक, महिला बँक स्थापन करण्यास त्यांनी प्रा. महम्मद युनूस यांना संधी प्राप्त करून दिली. त्याच पद्धतीने त्यांनी बांगला देशला आपल्या तिसर्या कारकिर्दीत देश डिजिटल बनविण्याचे स्वप्न पाहिले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती असो, उद्योग क्षेत्रातील सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना करावयाची मदत असो आणि बांगला देशातील वस्त्रोद्योगाचे नोंदणीकरण असो, या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी बांगला देशचा विकास करतानाच महागाईचा दर कमी करण्याचे प्रयत्न केले. शिवाय त्यांनी बांगला देशला स्वावलंबी बनवण्याच्या द़ृष्टीने पावले टाकली. भांडी उद्योग, खेळणी उद्योग अशा अनेक उद्योगांत बांगला देशचा ठसा उमटवला आणि जगाच्या बाजारपेठेत बांगला देशच्या उत्पादनांना सन्मान मिळवून दिला.
पाकिस्तानच्या ताब्यात असताना बांगला देशची कोंडी झाली होती. पण स्वातंत्र्यानंतर आज पाकिस्तानला मागे टाकून बांगला देश आर्थिक विकास, सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास, कृषी विकास या क्षेत्रात दमदार पावले टाकत पुढे निघून गेला आहे. त्यांनी जगातील प्रमुख राष्ट्रप्रमुखांशी केलेला सुसंवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्रिक्स, आसियान, दक्षिण आशिया परिषद, सार्क, जी-20 अशा अनेक परिषदांतून त्यांनी भाग घेतला. नेपाळ, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान ही राष्ट्रे आर्थिक प्रलोभनांमुळे चीनच्या कच्छपि लागली; पण सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मात्र चिनी कर्जविळख्यात अडकण्यापासून नेहमीच बांगला देशचा बचाव होईल, अशी भूमिका घेतली. तसेच चीन आणि भारत यांच्याशी संबंधांमध्ये हसीना यांनी नेहमीच भारताला झुकते माप दिले आहे.
संघर्ष कशामुळे?
बांगला देशचा विकासरथ अशा प्रकारे धावत असताना मग अचानक तेथे संघर्षमय स्थिती का ओढवली? याचा समूळ शोध घेतला असता असे लक्षात येते की, शेख हसीना यांनी 15 वी घटनादुरुस्ती करून हंगामी सरकारची तरतूद रद्द केली. हे सरकार संपल्यानंतर निवडणुका होऊन नवे सरकार येईल, अशा प्रकारची तरतूद केली. त्यामुळे दरवर्षी दोन वर्षे हंगामी सरकारचे जे नाटक चालायचे, त्या काळामध्ये हिंसा फार होत असे. त्याला लगाम बसणार आहे. दोन-तीन वेळा बांगला देशमध्ये लोकांनी हे हंगामी सरकारचे नाटक पाहिले आहे. अशा पद्धतीची अस्थिरता येऊ नये म्हणून त्यांनी पंधरावी घटनादुरुस्ती करून ही तरतूद रद्द केली. परंतु त्यावेळी विरोधकांंची मात्रा चालली नाही. आता तेच विरोधक तोच विषय उकरून काढून हंगामी सरकार स्थापन करा, अशी मागणी करत आंदोलनाचा मार्ग पत्करत आहेत; परंतु बांगला देशातील जनतेचा कल हा शेख हसीना यांच्याच बाजूने आहे आणि त्या हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवतील याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. येत्या काळात जगातील सर्वात जास्त काळ सेवा करणार्या महिला पंतप्रधान अशी त्यांची नोंद होताना दिसणार आहे.
भारताचा विचार करता शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत-बांगला देशचे संबंध घनिष्ट बनले आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारही वाढला आहे. अलीकडेच त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत डिजिटल माध्यमातून तीन विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये त्रिपुरातील निश्चिंतपूर आणि बांगला देशातील गंगासागर दरम्यानचा महत्त्वाचा रेल्वे मार्ग, 65 किमी लांबीचा खुलना-मोंगला बंदर रेल्वे मार्ग आणि बांगला देशातील रामपाल येथील 'मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांट'चे दुसरे युनिट समाविष्ट आहे.
अंदाजे 15 किमी लांबीच्या आगरतळा-अखौरा क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंकमुळे सीमापार व्यापाराला चालना मिळणार आहे आणि ढाका मार्गे आगरतळा आणि कोलकाता दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी हसीना यांनी बांगला देश आणि भारत परस्पर सहकार्याने आगामी काळात अनेक यश संपादन करतील, ज्यामुळे भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध अधिक द़ृढ होतील, असे म्हटले आहे. त्यामुळे बांगला देशात सध्या सुरू असलेला संघर्ष तणाव निवळून शेख हसीना पुन्हा सत्तेत विराजमान व्हाव्यात, हीच भारताची भूमिका आहे.

