सातारा : मराठा आंदोलकांचा पालकंत्र्यांवर भडीमार

सातारा : मराठा आंदोलकांचा पालकंत्र्यांवर भडीमार
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात आलेल्या उपसमितीचे सदस्य असलेले सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार करत त्यांना जाब विचारले. त्यावर बोलताना देसाई यांनी मुख्यमंत्री मराठा आरक्षण देतील, अशी ग्वाही दिली. दरम्यान, संतप्त आंदोलकांनी दोन दिवस इथं बसून बघा, असे आव्हानही देसाईंना दिले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज-जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून सातार्‍यात मराठा क्रांती मोर्चाने साखळी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले तेव्हा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

संतप्त आंदोलकांनी त्यांच्यावर एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार करायला सुरूवात केली. तुमच्या सरकारने मराठयांना आरक्षणासाठी झुलवत ठेवले आहे. केवळ सहानभूती दाखवू नका आरक्षण कधी देताय? हे सांगा. मुख्यमंत्र्यांच्या शपथेवर आमचा विश्वास नाही, असे खडेबोलही पालकमंत्र्यांना सुनावले.

तुमच्या मंत्रिमंडळात मराठा समाजाची जाण असणारा एक तरी मराठा आमदार दाखवावा? मुख्यमंत्र्यांच्या सर्वात जवळचे मंत्री म्हणून तुमची ओळख आहे. पण तुम्ही आरक्षणासाठी काय केले? मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, तुम्ही कधी देताय ते सांगा? काहीही करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या. आरक्षण देण्यासाठी तुम्ही काय करताय त्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही. जर सहानभूती आहे तर तुम्ही दोन दिवस उपाशी आहे का? तुम्ही काय करताय तुम्हाला आमच्या भावना समजत नाहीत का? लोकं जीव देतायंत ते पुरेसे नाही का? आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री असण्याचा आम्हाला काय फायदा? इथे फक्त फोटोसेशन केले जाते मात्र, प्रश्न जसेच्या तसे आहेत. आरक्षण देणार का? देणार तर कधी देणार? आणि कशाची वाट बघतायं? सरकारने परस्पर शिंदे समितीला वेळ वाढवून दिला त्याचे कारण काय? असा अनेक प्रश्नांचा भडीमार देसाई यांच्यावर करण्यात आला.
यावेळी देसाई यांनी मराठा आरक्षण हे सरकार नक्की देईल. मुख्यमंत्री त्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले.

राजकारण्यांच्या शपथांवर विश्वास नाही…

मराठा आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत सर्व भरती तात्काळ थांबवण्याची मागणी केली. मराठा मुलांना 95 टक्केसारखे चांगले गुण असतानाही नोकर्‍या मिळत नाहीत हे आणखी किती दिवस चालणार? असे प्रश्न केल्यावर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची शपथ घेतल्याचे सांगितले. यावर आंदोलकांनी जोरदार प्रत्युत्तर देत राजकारण्यांनी घेतलेल्या शपथांवरही आमचा विश्वास राहिला नसल्याचे खडेबोल सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news