

पुढारी ऑनलाईन
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे कपल नुकतेच आई-बाबा बनले आहेत. खरे तर, या बातमीनंतर आता प्रियांकाला तिच्या बाळाला वेळ द्यावा लागेल, हे लक्षात घेऊन फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मधून प्रियांका आऊट होणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण, दुसरीकडे हॉलीवूडमध्ये मात्र प्रियांकाच्या करिअरची गाडी सुसाट धावत आहे. नुकतीच ती 'मॅट्रिक्स ः द रिसरक्शन्स'मध्ये दिसली होती. रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या थ्रिलर सीरिजमध्येही ती आहे.
त्यानंतर आता पीसीला एक नवा चित्रपट मिळाला आहे. 'एंडिंग थिंग्ज' असे या चित्रपटाचे नाव असून केविन सुलिवन दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे अॅन्थनी मॅकी. तोच अभिनेता ज्याने मार्व्हल स्टुडिओजच्या 'कॅप्टन अमेरिका'सह विविध चित्रपटांमध्ये सॅम विल्सन तथा फाल्कन हा सुपर हीरो साकारला आहे. 'अॅव्हेंजर्स ः एंडगेम'मध्ये शेवटी कॅप्टन अमेरिका त्याची ढाल सॅमलाच देतो. त्याच्यावर मार्व्हलने 'फाल्कन अँड द विंटर सोल्जर' ही स्वतंत्र सीरिजही काढली. दरम्यान 'एंडिंग थिंग्ज' हा चित्रपट 1994 च्या जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'ट्रु लाईज' या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जिम स्ट्रॉस दिग्दर्शित 'टेक्स्ट फॉर यू' रॉमकॉमध्येही प्रियांका दिसणार आहे, तसेच ओशो यांच्या सहकारी माँ शीला आनंद यांच्यावर अॅमेझॉन प्राईम व्हिडीओद्वारे बनवल्या जात असलेल्या चित्रपटातही प्रियांका आहे.