

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सरकारने देशातील गरीब आणि उपेक्षित वर्गासाठी अनेक जनहिताच्या योजना राबवल्या आहेत. तसेच मध्यमवर्गाचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठीही अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे खास करून मध्यमवर्गाला या लाभदायी योजनांची सविस्तर माहिती पोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत जा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाला दिल्या.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी विविध योजना, निर्णयांचा आढावा घेतला. सकाळी सुरू झालेली बैठक सायंकाळी संपली. यावर्षीची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचा व त्यांच्या अंमलबजावणीचा तसेच विविध योजनांचा बारकाईने आढावा घेतला. ज्या लोककल्याणकारी योजना सरकार राबवत आहे, त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. आपल्या सरकारने देशातील उपेक्षित आणि गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांच्या उत्थानासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा.
मध्यमवर्गीयांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देताना पंतप्रधान म्हणाले की, मध्यमवर्गाचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी सरकारच्या वतीने विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या, त्यांची अंमलबजावणी केली आहे. अशा स्थितीत या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यमवर्गीयांपर्यंत जाण्याच्या सूचना त्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या. हे करताना या योजनांची अत्यंत सविस्तर आणि तपशीलवार माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.