फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींसाठी रेड कार्पेट

फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींसाठी रेड कार्पेट
Published on
Updated on

पॅरिस : भारत-फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी पॅरिसला पोहोचले असून, फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी पॅरिस विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत केले. विमानतळावर मोदींसाठी खास रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. यावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, या दौर्‍यात राफेल विमाने आणि पाणबुड्यांच्या खरेदीविषयी दोन्ही देशांत अनेक महत्त्वपूर्ण करार होणार आहेत.

पॅरिसमधील ला सीएन म्युझिकल येथे पंतप्रधान मोदी विशेष संबोधन करणार असून, ला सीएन म्युझिकलतर्फे भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 'नमस्ते फ्रान्स' या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन करण्यात येत आहे.

मॅक्रॉन देणार विशेष मेजवानी

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे त्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या एलसी पॅलेसमध्ये मोदी यांना विशेष मेजवानी (प्रायव्हेट डिनर) देणार आहेत. यादरम्यान मॅक्रॉन आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चाही होणार आहे.

26 राफेल, 3 पाणबुड्यांची खरेदी

संरक्षण क्षेत्राच्या द़ृष्टीने मोदींचा हा दौरा विशेष मानला जात आहे. या दौर्‍यात भारत आणि फ्रान्स यांच्यात 'राफेल एम' लढाऊ विमानाबाबत करार होण्याची शक्यता आहे. नौदलासाठी भारत फ्रान्सकडून 26 'राफेल एम' म्हणजेच सागरी लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. त्यांची किंमत 45 हजार कोटी रुपये आहे. याखेरीज 3 स्कॉर्पियन क्लास पाणबुड्यांच्या खरेदीचा करारही उभय देशांत होऊ शकतो. ही विमाने म्हणजे सध्याच्या राफेलची सागरी आवृत्ती आहे. 'आयएनएस विक्रांत' आणि 'विक्रमादित्य' या विमानवाहू नौकांवर ती तैनात केली जाणार आहेत. त्यासाठी 'आयएनएस विक्रांत'च्या सागरी चाचण्याही सुरू झाल्या आहेत. करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तांत्रिक आणि खर्चाची औपचारिकता पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्ष लागणार आहे.

'राफेल एम'ची पहिली खेप भारतात येण्यासाठी 3 वर्षे लागू शकतात. हवाईदलासाठी 36 राफेलचा सौदा 2016 मध्ये झाला होता आणि ती भारतात दाखल होण्यासाठी 7 वर्षे लागली होती.

14 वर्षांनंतर मिळणार विशेष बहुमान

मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यातील खास बाब म्हणजे, 14 जुलै (शुक्रवारी) पॅरिसमधील बॅस्टिल डे परेडमध्ये मोदी हे प्रमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताला हा बहुमान 14 वर्षांनंतर मिळणार आहे. यापूर्वी 2009 मध्ये डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांना या परेडसाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, फ्रान्सचा दौरा पार पडल्यानंतर 15 जुलै रोजी मोदी संयुक्त अरब अमिरातच्या दौर्‍यासाठी रवाना होतील.

फ्रान्सकडून प्रचंड शस्त्र खरेदी

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, फ्रान्स हा रशियानंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. 2016-20 या कालावधीत भारताची फ्रान्सकडून शस्त्रास्त्रांची खरेदी 70 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे, 2017-21 या कालावधीत रशियाकडून भारताचा शस्त्रास्त्रांचा पुरवठा 47 टक्क्यांनी घटला आणि फ्रान्सकडून भारताची शस्त्र खरेदी या काळात 10 पटीने वाढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news