पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दि. 12) महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात मोदी हे सुमारे 30 हजार 500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधान नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण करतील. तसेच पंतप्रधान हे नवी मुंबईत सायंकाळी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभांरभ करणार आहेत. या ठिकाणी ते जनतेला संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये 12 ते 16 जानेवारीदरम्यान आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये दाखल होतील. 'विकसित भारत 2047 : युवकांसाठी, युवकांकडून' ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. देशभरातील सुमारे साडेसात हजार युवक-युवती यात सहभागी होतील. त्यानंतर ते दुपारी दोनच्या सुमारास मुंबईत दाखल होतील. ते शिवडी येथून
नवी मुंबईकडे अटल सेतूवरून प्रवास करतील. दुपारी साडेतीनच्या सुमारास नवी मुंबईत जातील. तेथे 12 हजार 700 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन ते करणार आहेत. त्यात पूर्व मुक्त (ईस्टर्न फ्री वे) महामार्गालगत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हदरम्यानच्या सव्वानऊ किलोमीटरच्या बोगद्याच्या भूमिपूजनाचा समावेश आहे. यासाठी 8,700 कोटी रुपये खर्च येणार असून, ऑरेंज गेटवरून थेट मरीन ड्राईव्हला जाता येईल.

उरण-खारकोपर लोकल दुसरा टप्प्याचे लोकार्पण

उरण-खारकोपर लोकलच्या दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी करतील. ठाणे आणि ऐरोलीदरम्यानचे दिघा गाव रेल्वेस्थानक तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरच्या खार रोड ते गोरेगावदरम्यानच्या सहाव्या रेल्वेमार्गाचे लोकार्पणही मोदी करतील. बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई महापालिकेने बांधलेल्या मेट्रोलाही मोदी औपचारिक हिरवा झेंडा दाखवतील.

पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन

पालघर व ठाणे जिल्ह्यातील 14 लाख नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवणार्‍या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल. यासोबतच, सीप्झ (सेझ) मधील 'भारत रत्नम' या दागदागिने क्षेत्रासाठीच्या विशेष सुविधा क्षेत्राचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळावरील मैदानात जनतेला संबोधित करतील. त्यानंतर ते सायंकाळी उशिरा दिल्लीकडे प्रयाण करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news