

नगर, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे उभारण्यासाठी सर्व विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र पंधरा दिवसांमध्ये सादर करा. त्यानंतर तत्काळ पुढील कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.10) बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे उपस्थित होते. नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा झाला आहे. आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर आणि महापौर रोहिणी शेंडगे यांनी पुतळा उभारण्यासंदर्भात वारंवार मनपा प्रशासन दरबारी पाठपुरवा केला. त्यात स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी पुतळा उभारणीचा विषय स्थायी समितीमध्ये वारंवार लावून धरला आहे. मात्र, अद्यापही पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महापुरूषांचे पुतळे उभारण्यासंदर्भात सोमवारी कृती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी भोसले यांनी सर्वच महापुरूषांचे पुतळे उभारण्यासंदर्भात केलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात मनपा प्रशासनाला विचारणा केली. तर, त्यांनी विविध विभागांचे एनओसी नसल्याचे सांगितले. त्यावर महापालिकेने पुतळा उभारण्यासाठी सुमारे पाच विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र व सर्व कागदपत्रे दहा दिवसांत सादर करावी, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
कला संचानालय मुंबई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र शासन, मंत्रालयाचा नगररचना विभाग आणि पोलिस अधीक्षक कार्यालय नगर, अशा चार विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र पुतळा उभारणीसाठी आवश्यक आहे. त्यातील पोलिसांनी ना-हरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकार्यांकडे सादर केले आहे. तर, अन्य विभागांचे एनओसी येणे बाकी आहे. तसेच, विविध विभागाचे हमीपत्रही सादर करावे लागणार आहे. ही सर्व कागदपत्रे पंधरा दिवसांत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.