

पुढारी ऑनलाईन डेस्क
बीआर चोप्रा यांची मालिका महाभारतमध्ये भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार (Praveen Kumar) सोबती यांचं निधन झालं आहे. प्रवीण कुमार (Praveen Kumar) ७४ वर्षांचे होते. प्रवीण आपल्या व्यक्तीमत्वामुळे ओळखले जातात. त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांची उंची साडे सहा फूट होती. ते पंजाबचे राहणारे होते.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण एक डिस्कस थ्रो ॲथलीट होते. त्यांनी आशियाई खेळांमध्ये चार पदके (२ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कास्य) जिंकली आहेत. त्यांनी दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या आहेत. १९६८ मेक्सिको खेळ आणि १९७२ म्युनिख खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांना अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. खेळामुळे प्रवीण कुमार यांनी सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये डेप्युटी कमांडेंटची नोकरी मिळाली.
ट्रॅक आणि फील्ड स्पोर्ट्समध्ये यशस्वी करिअरनंतर प्रवीण यांनी ७० च्या दशकात मनोरंजच्या विश्वात पाऊल ठेवलं. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही आठवणी सांगितल्या होत्या. प्रवीण आपला पहिला बॉलीवूड चित्रपट करत होते. एक टूर्नामेंटसाठी ते काश्मीरमध्ये होते. त्यांची पहिली भूमिका रविकांत नागाइच यांच्या दिग्दर्शित चित्रपटात होती. पण, यामध्ये त्यांचा डायलॉग नव्हता.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रवीण कुमार यांनी एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ते खूप अधिक काळ घरातचं आहेत. त्यांची प्रकृती ठिक नाही. खाण्याबाबत अनेक पथ्य आहेत. स्पायनल प्रॉब्लेम आहे. घरात पत्नी वीणा, प्रवीण कुमार यांची देखभाल करत होत्या त्यांना एक मुलगी असून ती मुंबईमध्ये असते.
पेन्शनवरून प्रवीण कुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती. एशियन गेम्स किंवा पदक जिंकणारे जितके खेळाडू होते, त्या सर्वांना पेन्शन दिली होती. पण, प्रवीण यांना वंचित ठेवण्यात आलं. पण, सर्वात अधिक सुवर्ण पदके प्रवीण यांनी मिळवली होती.