व्यक्‍तिचित्र : ‘तो’ हरला अन् जिंकलाही!

व्यक्‍तिचित्र : ‘तो’ हरला अन् जिंकलाही!
Published on
Updated on

बुद्धिबळासारख्या वैचारिक खेळामध्ये विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी भरपूर अनुभव पाठीशी असावा लागतो. यापूर्वी पाचवेळा विश्वविजेतेपद मिळवणार्‍या मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्धची अंतिम लढत भारताच्या अठरा वर्षीय खेळाडू प्रज्ञानंद रमेशबाबू याने गमावली. मात्र, पहिल्यांदाच ही अंतिम लढत खेळणार्‍या प्रज्ञानंद याने सार्‍या जगाची मने जिंकली, असेच म्हणावे लागेल.

विश्वविजेतेपदासाठी झालेल्या लढतीत प्रज्ञानंद याने कार्लसनविरुद्ध पहिले दोन्ही डाव बरोबरीत सोडविले. त्यामुळे या लढतीचा निर्णय ठरवण्यासाठी टायब्रेक पद्धतीचे डाव घेण्यात आले. त्यामध्ये कार्लसन याने दोन्ही डाव जिंकून बाजी मारली. एक मात्र नक्की, प्रज्ञानंद या अठरा वर्षीय खेळाडूने विश्वविजेतेपदाबाबत चार पावसाळे पाहिलेल्या कार्लसन याला दिलेली झुंजार लढत चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.

मुलांनी भुणभुण करू नये म्हणून पालक मुलांना टी.व्ही. बघायला सांगतात किंवा त्यांच्या हातात मोबाईल देतात. या सवयींचे लहान मुलांवर किती दुष्परिणाम होत आहेत, हे सर्वजण जाणून आहेत. मात्र, या दोन्ही सवयींपासून दूर राहावे म्हणून आपल्या मुलांना बुद्धिबळाच्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश दिला. त्यामुळेच भारताला आर. प्रज्ञानंद याच्या रूपाने चौसष्ट घरांचा किमयागार लाभला आहे. त्याची मोठी बहीण वैशाली हीदेखील उज्ज्वल भवितव्य लाभलेली बुद्धिबळपटू आहे.

भारतामध्ये बुद्धिबळाचे युग निर्माण करणार्‍या विश्वनाथन आनंद याने जेव्हा पहिल्यांदा विश्वविजेतेपदावर मोहर नोंदवली तेव्हा त्याच्या या पराक्रमाची फारशी दखल प्रसारमाध्यमांनी घेतली नव्हती. आज मात्र प्रज्ञानंद या अठरा वर्षीय खेळाडूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत घेतलेली उत्तुंग झेप केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. त्याने अंतिम फेरी गाठताना हिकारू नाकामुरा, फॅबिआनो कारूआना या श्रेष्ठ खेळाडूंसह अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंना पराभूत केले आहे.

पाचवेळा जगज्जेतेपद मिळविणार्‍या आनंद याचा वारसदार कोण होणार? अशी तीन-चार वर्षांपूर्वी चर्चा होत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये प्रज्ञानंद, डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी व विदित गुजराथी यांनी आपल्यामध्ये आनंदचा वारसदार होण्याची क्षमता आहे, हे सिद्ध केले आहे. विश्वविजेता असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा विजयरथ रोखण्यासाठी असलेले कौशल्यही आपल्याकडे आहे, याची झलक त्यांनी दाखवून दिली आहे. या चारही खेळाडूंनी कार्लसन याला पराभवाची चव चाखावयास लावली आहे. अर्थात, हे सारे काही अचानक घडलेले नाही. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये भारतात बुद्धिबळ संघटनांनी आणि प्रशिक्षकांनी बुद्धिबळाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आहेत. स्पर्धांची संख्याही भरपूर वाढली आहे. या खेळामध्ये उत्तुंग करिअर घडवता येते, हेदेखील सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकही आपल्या मुलांना या खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य देऊ लागले आहेत.

बुद्धिबळपटूंचा खजिना असलेल्या तामिळनाडूमधील प्रज्ञानंद व वैशाली या भावंडांना टी.व्ही. आणि मोबाईलच्या अनिष्ट सवयी लागू नयेत म्हणून त्यांच्या पालकांनी या भावंडांना आर. बी. रमेश यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकांकडे बुद्धिबळाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यामुळे या भावंडांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण झाली नसती तर नवलच! अर्थात त्यांच्या आई-वडिलांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. लहान मुलांमधील प्रावीण्य ओळखण्याची आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत रमेश यांच्यासारखा दुसरा प्रशिक्षक मिळणार नाही. हे सोन्यासारखे खेळाडू मिळाल्यानंतर रमेश यांनीदेखील हातचे कोणतेही न राखता या मुलांना खेळाचे भरपूर ज्ञान दिले आहे आणि अजूनही देत असतात.

प्रज्ञानंद याची बहीण वैशाली हिने सुरुवातीपासूनच आपल्या करिअरमध्ये अनेक आश्चर्यजनक विजय मिळवलेले आहेत. अगदी अलीकडे चेन्नई येथेच आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत तिने पदकावरही आपले नाव कोरले होते.

सुरुवातीच्या काळात वैशालीचा धाकटा भाऊ म्हणूनच प्रज्ञानंद याची ओळख होती; मात्र आता या दोन्ही भावंडांनी केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावर आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे आपणही बुद्धिबळात देशाची शान उंचवावी, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत लहानपणापासूनच तो या खेळासाठी झपाटला गेला होता. त्यामुळे की काय, सुरुवातीच्या काळामध्ये तो सकाळी दहा ते सायंकाळी सात एवढा वेळ बुद्धिबळाचा सराव करीत असे. शाळेचा अभ्यास त्यानंतर घरी येऊन तो करीत असे. त्याचे वडील रमेशबाबू एका सहकारी बँकेत नोकरी करतात, त्यामुळे घरची सर्व जबाबदारी आणि या दोन्ही भावंडांच्या करिअरची जबाबदारीदेखील या भावंडांची आई नागलक्ष्मी या समर्थपणे सांभाळत असतात. परदेशातील खाद्यपदार्थांचा आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्या विशेष काळजी घेत असतात. विश्वचषक स्पर्धेतही प्रज्ञानंद याला त्रास होऊ नये म्हणून त्या स्वतः इंडक्शन स्टोव्ह आणि दोन-तीन भांडी घेऊन गेल्या होत्या.

प्रज्ञानंद याने सन 2013 मध्ये आठ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि फिडे मास्टर किताब मिळविला आणि मग तेथून त्याने मागे पाहिलेच नाही. जेमतेम दहा वर्षांचा असताना त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पटकावत हा मान मिळविणारा सर्वात लहान खेळाडू होण्याची कामगिरीही केली. सन 2018 मध्ये त्याने ग्रँडमास्टर हा किताब घेत यशाचा आणखी एक पल्ला पार केला. त्यावेळी तो जेमतेम बारा वर्षांचा होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये त्याने केवळ कनिष्ठ नव्हे, तर वरिष्ठ गटातही जागतिक स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. ही कामगिरी करत असताना त्याने आपल्यापेक्षा अनुभव आणि मानांकनांमध्ये वरचढ असलेल्या अनेक खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला आहे.घरच्या वातावरणातच आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ
ऑलिंपियाड स्पर्धेत प्रज्ञानानंद यालाही भाग घेण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेमध्ये जगातील सर्वच श्रेष्ठ खेळाडू सहभागी झाले होते. त्यांचे डावपेच बारकाईने पाहण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याचाही त्याने भावी कारकिर्दीसाठी फायदा घेतला नाही तर नवलच. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य व डावपेच अल्पावधीतच आत्मसात करण्याची शैली त्याच्याकडे आहे.

विश्वचषक स्पर्धेतही त्याने याच कामगिरीचा परिपाठ गिरवला आहे. नाकामुरा याच्यासारख्या दिग्गज खेळाडूवर त्याने 3-1 असा विजय मिळवला होता. उपांत्यपूर्व फेरीत आपलाच ज्येष्ठ सहकारी एरिगेसी याच्यावरही त्याने नेत्रदीपक विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्याने कारूआना या श्रेष्ठ खेळाडूला पराभूत करीत बुद्धिबळ पंडितांना आश्चर्यचकित केले. पराभवाच्या छायेतून विजय मिळवण्याची किंवा डावात बरोबरी करण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे त्याने दाखवून दिले आहे. सहजासहजी आपल्या प्रतिस्पर्ध्याला विजय मिळविण्यापासून वंचित ठेवायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत तो अनेक वेगवेगळे डावपेच वापरत असतो. त्याच्या या डावपेचांनी अंतिम फेरीतही कार्लसन यालाही चकित केले होते. जगज्जेता खेळाडू गॅरी कास्पारोव्ह याच्यासह अनेक श्रेष्ठ खेळाडूंनी त्याच्या खेळाचे भरभरून कौतुक केले आहे.

प्रज्ञानानंद, डी.गुकेश, अर्जुन एरिगेसी व विदीत गुजराथी यांनी नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती तेव्हाच बुद्धिबळात जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करण्याची क्षमता भारताकडे आहे हे सिद्ध झाले आहे. विश्व विजेते होण्याची क्षमता केवळ एका नव्हे तर अनेक खेळाडूंमध्ये आहे याचीही झलक यंदा पहावयास मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news