

नवी दिल्ली, ११ जुलै, पुढारी वृत्तसेवा, NDA Meet : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टी संघटनात्मक फेरबदल करीत पक्ष बळकटीच्या कामाला लागला आहे. एनडीएला देखील आणखी भक्कम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विरोधकांच्या महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता कमी असलेल्या प्रादेशिक पक्षांवर भाजपने त्यामुळे लक्ष केंद्रित केले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राजधानी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये १८ जुलैला महत्वाची बैठक बोलावण्यात आली असून अनेक राजकीय पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी बोलावण्यात येणारी ही बैठक असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी एनडीएला आणखी बळकट करण्याच्या अनुषंगाने पक्षाचे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
एनडीएमधील नाराज पक्ष बैठकीत सहभागी होणार असले तरी नवीन पक्षांना आघाडीत शामिल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा राहणार आहे. अद्याप किती पक्ष एनडीएत शामिल होणार हे स्पष्ट झालेले नाही. राज्य मंत्रिमंडळात सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट देखील बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश मधील ओमप्रकाश राजभर यांची सुहेलदेव भारतीय समाज पार्टी एनडीएत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. आरएलडीचे जयंत चौधरी यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे.
जीतन राम मांझी यांची 'हम', चिराग पासवान यांची 'लोजपा रामविलास गट', मुकेश साहनी यांची 'व्हीआयपी पार्टी', उपेंद्र कुशवाहा यांची 'आरएलएसपी' एनडीएत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. एनडीएमधील जुना मित्र पक्ष 'अकाली दल' तसेच 'टीडीपी' सोबत देखील भाजपची चर्चा सुरू असल्याचे कळतेय. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासह प्रादेशिक पक्षांना महाआघाडीत जाण्यापासून परावृत्त करीत विरोधकांची मोट कमकुवत करण्याचा मानस सत्ताधाऱ्यांचा आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये इतर पक्षांना भाजप जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.