कोल्हापूर : कुस्ती आखाड्यात राजकीय दिग्गज एकत्र

कोल्हापूर : कुस्ती आखाड्यात राजकीय दिग्गज एकत्र
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित शाहू खासबाग कुस्ती आखाड्याला आणि संभाजीराजे यांच्या सत्काराला आजी-माजी पालकमंत्र्यांसह दोन्ही खासदार, आजी-माजी आमदार यांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती राहिल्याने तो एक चर्चेचा विषय राहिला. यावेळी सत्काराच्या कार्यक्रमात राजकीय चर्चा होईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची किनार असली तरी राजकीय चर्चा करणे सर्वांनीच टाळले. दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मभूषण महाबली सतपाल यांनी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीला सुवर्णपदक मिळवून देण्याचे ध्येय महाराष्ट्रातील युवा पैलवानांनी निश्चित करावे आणि त्याद़ृष्टीने मेहनत घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. गौरव समितीच्या वतीने चांदीची गदा, शाल व पुष्पहार अर्पण करून संभाजीराजे यांचा सत्कार करण्यात आला.

'गोकुळ'च्या वतीने भव्य मैदान

खासबाग मैदानातील कुस्तीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून कुस्तीशौकीन व तालीम संस्थांच्या वतीने अशोक पोवार यांनी गोकुळ आणि जिल्हा बँकेने कुस्तीचे मैदान घ्यावे, अशी मागणी केली होती. त्याचा संदर्भ देत पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मी आणि सतेज पाटील यांनी आताच चर्चा केली. त्यानुसार 'गोकुळ'च्या वतीने कुस्त्यांचे मैदान भरविले जाईल, असे आश्वासन दिले.

यशाची अनेक शिखरे पार करा : केसरकर

शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरच्या या घराण्यावर सर्वच जण नितांत प्रेम करतात आणि हे घराणे जनतेवर प्रेम करत असल्याचे सांगून संभाजीराजे यांनी भविष्यात यशाची अनेक शिखरे पार करावीत, अशा शुभेच्छा दिल्या.

संभाजीराजेंचा चांदीची गदा देऊन सत्कार

गौरव समितीच्या वतीने संभाजीराजेंचा वाढदिवसानिमित्त चांदीची गदा देऊन हिंदकेसरी महाबली सतपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संभाजीराजे यांनी प्रत्येक वर्षी कुस्तीचे मैदान घेण्यात येईल आणि स्वराज्य केसरीच्या पहिल्या क्रमांकासाठी ही गदा फिरती ठेवण्यात येईल, असे जाहीर केले. तसेच तालीम संघासाठी पाच लाखांचा धनादेश तालीम संघाकडे सुपूर्द केला.

दरवर्षी कुस्त्यांचे मैदान भरवू : संभाजीराजे

शाहू महाराज यांनी या मैदानात अनेक चटकदार कुस्त्या मी पाहिल्या आहेत. कुस्तीला राजर्षी छत्रपती शाहू, छत्रपती राजाराम महाराजांनी राजाश्रय दिला. त्यामुळे कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. संभाजीराजे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी कुस्त्यांचे मैदान भरविले जाईल आणि मला भेट दिलेली चांदीची गदा ही फिरती गदा म्हणून बक्षीस दिली जाईल, असे जाहीर केले. यावेळी आ. पी. एन पाटील, आ. सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, चंद्रदीप नरके, व्ही. बी. पाटील, संयोगिताराजे, मधुरिमाराजे यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीदेखील कार्यक्रम स्थळी येऊन शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news