

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा
चंद्रपूरमधील बल्लारपूर मार्गाने दुचाकीवरून येत असताना झुडपाच्या आडोशाला दबा धरून बसलेल्या बिबट्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर झडप घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज शनिवारी ( दि. 4 डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली. अविनाश पडोळे असे मृत अधिका-याचे नाव आहे.
चंद्रपूर पोलीस ठाण्यात वायरलेस विभागात पोलिस अविनिश पडोळे सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. ते बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्ड येथील रहिवाशी आहेत.
आज शनिवारी ते दुपारच्या सुमारास एम.एच.३४- ए.टी – २०५७ या दुचाकीने चंद्रपूर येथून बल्लारपूर ला जात होते. दरम्यान बल्लारपूर शहराच्या प्रवेशद्वार जवळ पॉवर हाऊस शेजारी झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने पडोळे यांच्यावर झडप घातली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या घटनेत दुचाकीसह ते खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.
त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या एका वाहनचालकाने आरडाओरड केल्याने बिबट झुडपात पळून गेला. त्यांनी लगेच जखमी अधिका-याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पडोळे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटना स्थळालगत लाखो रुपये खर्च करून स्वागत गेट तयार करण्यात आले आहे. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने त्याचा आडोसा घेवून वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. याकडे नगर परिषद आणि वनविभाग दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा