

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वसुलीचा कारनामा चव्हाट्यावर आल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यातून थेट मुख्यालयात उचलबांगडी केलेल्या'त्या' पोलिस कर्मचार्याची आता गुन्हे शाखेत वर्णी लागली आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी त्याच्या गैरकृत्याची गांभीर्याने दखल घेत आपल्या कार्यकाळात ही कारवाई केली होती. गेल्या तीन वर्षांपासून हा कर्मचारी मुख्यालयातच कार्यरत होता. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी देखील त्याला आहे त्याच ठिकाणी ठेवले होते. मात्र, आता त्याच्या बदलीसाठी एवढी तत्परता कोणी दाखवली, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
व्यंकटेशम यांनी वसुलीबहाद्दरांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीमच हाती घेतली होती. एवढेच नाही, तर मातब्बर वसुलीवाल्यांची कुंडली तयार करून त्यांना थेट मोटार विभागाचा (एमटी) रस्ता दाखविण्याचे नियोजन केले होते. गुन्हे शाखेत वर्णी लागलेल्या या वसुलीवाल्याबाबत तर त्यांनी कडक भूमिका घेत त्याला मुख्यालयातून बाहेर काढू नये, असाच पवित्रा घेतला होता. एवढेच नाही, तर या वसुलीवाल्याच्या प्रतापामुळे त्या वेळी येरवडा पोलिस ठाण्याचे तपास पथक बरखास्त करून थेट महिलांची तेथे नेमणूक केली होती.
पथकातील अधिकार्यापासून ते कर्मचार्यांपर्यंत सर्वच महिला होत्या. गुप्ता यांच्या कार्यकाळात देखील त्याने आपली ताकद वापरून सुरुवातीपासूनच मुख्यालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या कृत्याची त्यांनीसुद्धा गंभीर दखल घेत त्याची बदली केली नाही. आता नुकतीच या महाशयांची (ग्रेड) पोलिस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे. मात्र, वसुलीचा मोह काही केल्याने त्यांना सुटताना दिसून येत नाही. 'जेथे जाऊ तेथे वसुलीच करू' असा छंदच त्यांना जडला आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी शहर पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकार्याचे विशिष्ट काम हाती घेतले होते.
पूर्वी येरवडा पोलिस ठाण्यात मलाईदार काम केल्यामुळे यांना 20 वर्षांचा अनुभव असल्याचे बोलले जाते. मात्र, पूर्वाश्रमीचे कारनामे संबंधितांच्या कानावर येताच त्यांनी 'रुको जरा भाई' अशीच भूमिका घेतली. गुन्हे शाखेत बदली होताच त्यांनी परत चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळविण्यासाठी जोर लावला आहे. मात्र, एकीकडे गुन्हे शाखेत बदली करताना, अर्ज मागवून, मुलाखती घेऊन, त्यांच्या पूर्वीच्या चांगल्या-गैर कामाची माहिती घेतल्यानंतरच संबंधित कर्मचार्याची बदली केली जाते. असे असताना या एवढ्या हिट कर्मचार्याची बदली गुन्हे शाखेत करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खास वसुलीसाठीच बदली?
शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्याची तर थेट वसुलीसाठीच कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर कोथरूड पोलिस ठाण्यातून लष्कर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. एकीकडे गंभीर कारण वगळता ठाण्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय दुसर्या ठिकाणी बदली केली जात नाही. मात्र, या कर्मचार्याची नियम धाब्यावर बसवून बदली करण्यात आल्याने त्याला वरदहस्त कोणाचा, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. गुन्हे शाखेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बंडगार्डन पोलिस ठाण्यात बदली झाली होती.
मात्र, काम ते पोलिस उपायुक्त कार्यालयाचेच करीत होते. त्यासाठी 'प्रतिनियुक्ती' हा गोंडस शब्द वापरला जातो. त्यांच्याही कृत्याची दखल घेत तत्कालीन पोलिस आयुक्तांनी त्यांना कोथरूड येथे धाडले. मात्र, मोह वसुलीचा असल्यामुळे तेथे त्यांचे 'मन' रमेना. एक वर्षाचा कालावधी पूर्ण होताच, त्यांनी परत लष्कर येथे येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. अखेर त्यांना यश आले आणि लष्कर पोलिस ठाण्यात वर्णी लागली. मात्र, सध्या त्यांची तेथे नेमणूक असली तरी प्रतिनियुक्तीवर उपायुक्त कार्यालयात राहून भलताच कारभार ते सांभाळत आहेत. अशा प्रकारे इतर काही जणांच्यासुद्धा बदल्या करण्यात आल्याचे दिसून येते.
'मुन्नाभाईची चलती जोरात'
मुन्नाभाईची एका ठिकाणी नेमणूक असली, तरी तो 'आर्थिक कर्तव्य' मात्र परिमंडल एक, दोन आणि तीनचे बजावतो आहे. खात्यातून निवृत्त झालेल्या एका पोलिसाला सोबत घेऊन आडबाजूला राहून तो आपली कामगिरी चोख निभावतो आहे. 'काम कम वसुली जादा' असेच काहीसे सूत्र त्याने देखील ठेवले आहे. एवढेच की काय कमी म्हणून त्याच्या डोक्यावर खास तिहेरी कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. कितीही त्रास झाला तरी वसुलीच्या ओझ्याने थोडेसेही न डगमगता तो त्याचे विशेष काम शासकीय कर्तव्य सोडून प्रामाणिकपणे करतो आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्याच्या कर्तव्यनिष्ठतेचा विचार करून त्याला या जबाबदारीतून मुक्त करणार की नाही, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.