

दिनेश गुप्ता
पुणे : उजाड माळरानावर शेती व जंगल बहरू शकते हे दाखवून दिलेय ते आजच्या प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संशोधनाने 'प्लांट टिश्यू कल्चर' अर्थात वनस्पती ऊतीसंवर्धनासारख्या महागड्या तंत्रज्ञानाचासुद्धा शेतकर्यांना वापर करणे सोपे झाले आहे. नव्या धोरणानुसार शेतकर्यांची स्वतःची एक छोटीशी 'प्लांट टिश्यू कल्चर' प्रयोगशाळा शेतातच कशी उभी राहील, यावर देशातील तज्ज्ञांचे काम सुरू आहे.
शेतीतील तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी 'शेतातच प्रयोगशाळा' असा प्रयोग राबवला जाऊ शकतो का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांकडून मते मागवली होती. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांनी शेतीतील रोपे व दुर्मीळ वनस्पतींचे संगोपन व संवर्धन कसे करता येईल, यावर संशोधन सुरू केले.
देश-विदेशात 10 बाय 10 च्या डब्यात वनस्पतींच्या ऊतींचे संवर्धन करून त्या जतन केल्या जाऊ शकतात, तर आपला शेतकरी का करू शकत नाही, हा विचार पुढे आला. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात 'प्लांट टिश्यू कल्चर'सारखे महागडे तंत्रज्ञानसुद्धा शेतकर्यांना वापरता येऊ शकते. शेतीतील पिकांवर तो स्वतःच संशोधन करून उपाय करू शकतो, यासाठी त्याला ऊतीसंवर्धन प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली.
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर डिसेंबरमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनात डॉ. काकोडकर यांच्यासमोर यावर काम करून घेण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती. 'किरणोत्सर्गाचा शेतीशी थेट संबंध नसला, तरी कृषिमाल दीर्घकाळ टिकण्याकरिता किरणोत्सर्ग हे उत्तम साधन ठरू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला.
एका रेडिएशनद्वारे एखादे फळ अथवा भाजी ही सहा महिन्यांकरिता उत्तम अवस्थेत राहू शकते. तसेच मातीच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्याकरितासुद्धा याचा बराच फायदा होतो, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
रोपट्यातील अथवा झाडातील काही महत्त्वाच्या आणि फायदेशीर ऊती टिकविण्यासाठी अथवा त्यांचे संवर्धन करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याला 'प्लांट टिश्यू कल्चर' अर्थात ऊतीसंवर्धन असे म्हणतात. उत्तम गुणवत्तेचे वाण रोपटे अथवा झाडांच्या ऊतींपासून त्याच प्रकारची अनेक रोपटी या तंत्राने तयार केली जातात.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण कार्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा असून, हजारो दुर्मीळ वनस्पती व झाडांचे संगोपन व संवर्धनाचे काम केले जाते. जर वनस्पतीतील पेशी जगवून नष्ट होणारी झाडे वाचवली जाऊ शकतात, तर शेतकर्यांच्या शेतीतील रोपे याच पद्धतीने प्रयोगशाळेत विकसित करून नैसर्गिक संकट आल्यावर ती पुन्हा शेतात उभी करणे सोपे होऊ शकते. ही पद्धत शेतीत राबविण्यासाठी केंद्रीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.