

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: आंद्रा धरण योजनेतून पहिल्या टप्प्यात शहरास 50 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. ते येत्या 20 दिवसांत समाविष्ट गावांना पुरविले जाईल. त्या भागातील अतिरिक्त पाणी वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, रावेत या भागांना दिले जाईल. त्यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि.17) व्यक्त केला.
'तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी; स्मार्ट सिटीमध्ये अनेक भागांत तक्रारी कायम' या शीर्षकाखाली 'पुढारी'ने सोमवार (दि. 17) ठळक वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन खा. बारणे, भाजपचे शहराध्यक्ष आ. महेश लांडगे, भाजप चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवार (दि. 17) चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. या वेळी खा. बारणे बोलत होते. त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवांन्ना गट्टुवार, ठेकेदार गोंडवाना इंजिनिअर्सचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
खा. बारणे म्हणाले की, आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणार्या 267 एमएलडी पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत आठ हेक्टर जागेत 300 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. तेथील दोन वाहिन्या जोडायच्या राहिल्या आहेत. त्याचे काम आठ दिवसांत होईल. येत्या 15 दिवसांत पाणी सोडण्याची चाचणी होईल. आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 50 एमएलडी पाणी उचलले जाईल. पुढील तीन महिन्यांत आणखी 50 एमएलडी पाणी उचलण्यात येईल. ते पाणी तळवडे, चिखली, मोशी, निघोजे, तळवडे, डुडुळगाव, चर्होली, दिघी या भागात पुरवले जाईल. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या वाढल्याने पवना धरणाव्यतिरिक्त अन्य जलस्त्रोत निर्माण करण्याची गरज होती. त्यादृष्टीने भाजपच्या काळात आंद्रा व भामा आसखेड प्रकल्प हाती घेण्यात आला. कोरोना महामारीमुळे दीड-दोन वर्षे प्रकल्पाचे काम संथ गतीने झाले; मात्र आता लवकरच नागरिकांना आंद्रा धरणातून पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होणार आहे, असे शंकर जगताप यांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात निघोजेतून 50 एमएलडी पाणी उचलले जाईल. पुढील तीन महिन्यांत आणखी 50 एमएलडी पाणी उचलण्यात येईल. त्यातून आंद्रा प्रकल्पातून मिळणार्या एकूण 100 एमएलडी पाणी तळवडे, चिखली, मोशी, निघोजे आणि तळवडे, डुडुळगाव, चर्होली, दिघी या भागांत पुरविले जाणार आहे. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. या भागाला पाणी मिळाल्याने शहराच्या उर्वरित भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे,
असे आ. महेश लांडगे यांनी सांगितले.