

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय व प्रबोधिनी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तेथे तब्बल 22 अग्निशमन बंब उभे राहतील, इतके प्रशस्त पार्किंगसह जवानांसाठी (फायरमन) निवास व्यवस्था असणार आहे.
तसेच, येथे महापालिकेसह राज्यभरातील 100 अग्निशमन जवानांना प्रशिक्षण (ट्रेनिंग) देण्याची सुसज्ज व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून भविष्यात, शहरातून अनेक प्रशिक्षित जवान निर्माण होणार होतील. (Latest Pune News)
अग्निशमन विभागाचे मध्यवर्ती मुख्यालय वायसीएम रुग्णालयाजवळील संत तुकारामनगर येथे आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने गांधीनगर, पिंपरी येथे नव्या प्रशस्त ठिकाणी मुख्यालय बांधण्यात येत आहे.
महिंद्रा कंपनीकडून ‘आयटूआर’ अंतर्गत मिळालेल्या 5.5 एकर जागेत हे मुख्यालय बांधण्यात येत आहे. इमारतीचा खर्च 126 कोटी 24 लाख रुपये इतका आहे. त्या खर्चास 21 जानेवारी 2025ला स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.कडून काम सुरू झाले असून, सध्या खोदकाम सुरू आहे.
आठ मजली प्रबोधिनी इमारत असणार आहे. तेथे जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एकूण 100 जवानांसाठी निवास व्यवस्था असणार आहे. दोनशे आसन क्षमतेचे प्रेक्षागृह व 50 आसन क्षमतेचे सेमिनार रूम असणार आहे. कवायत व प्रशिक्षणासाठी मैदान असणार आहे. कार्यालय व कार्यशाळा असणार आहे. संग्रहालयही असणार आहे.
अग्निशमन बंबांसह बोट वाहनतळ, ट्रेनिंग रूम, युद्ध कक्ष, ऑपरेशनल स्टाफ एरिया रूम, रेकॉर्ड रूम, मनोरंजन क्षेत्र, तयारी कक्ष, थिएटर आदी सुविधा असणार आहे. सोबत 118 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असेल. एकूण 22 अग्निशमन बंब उभे करता येतील, अशी प्रशस्त पार्किंग असणार आहे. इतर वाहनांची दोन मजली पार्किंग व्यवस्था असेल. अग्निशमन विभागातील कर्मचारी तसेच, प्रशिक्षणार्थी जवानांसाठी 15 मजली निवासी इमारत असणार आहे.
प्रबोधिनीत महापालिकेसह राज्यभरातील जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपत्तकालीन परिस्थिती जसे आग, भूकंप, पूर, भूस्खलन, अपघात, दुर्घटना अशा आप्तकालीन परिस्थितीचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षण व मार्गदर्शकही नेमले जाणार आहेत. या माध्यमातून भविष्यात पिंपरी-चिंचवडमधून असंख्य जवान तयार होतील. तसेच, महापालिकेच्या जवानांचीही कार्यक्षमता वाढणार आहे. त्यांना नवनवे तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करता येईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वाढत्या शहरासाठी महापालिकेची सज्जता
शहरात झपाट्याने वाढत असून, चारही बाजूने दाट लोकवस्ती निर्माण होत आहे. शहरातील अग्निसुरक्षा व आपत्कालीन सेवा अधिक मजबूत करण्यावर महापालिकेकडून भर दिला आहे. महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सक्षम करणे. जवानांना सातत्याने प्रशिक्षण देणे. जलद प्रतिसादासाठी केंद्रीकृत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिने महापालिका अत्याधुनिक अग्निशमन प्रशिक्षण अकादमी व निवासी संकुल प्रकल्प उभारत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जवानांच्या कार्यक्षमेत वाढ
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देते. ही अग्निशमन प्रशिक्षण अकादमी केवळ आमच्या कार्यक्षमतेत वाढ करणारी नाही, तर अग्निसुरक्षा प्रशिक्षणाचे केंद्र म्हणूनही उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांना अपघात कसे टाळावेत. जीव कसा वाचवावा याची माहिती मिळेल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
शहरवासीयांच्या सुरक्षेची गुंतवणूक
अत्याधुनिक अग्निशमन प्रशिक्षण अकादमी व निवासी संकुल प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महापालिका शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकप्रकारे गुंतवणूक करीत आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.