

water stagnation due to lack of tree plantation
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अर्बन स्ट्रीट डिजाईनअंतर्गत पदपथ रुंद करून सायकल ट्रॅक उभारले जात आहेत. पदपथाच्या कडेला सुशोभिकरण करण्यासाठी शोभिवंत रोपे व झाडे लावण्यासाठी माती टाकण्यात आली आहे.
त्यात झाडे न लावल्याने पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार्या महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे शहर विद्रुप होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Pimpri News)
महापालिकेतर्फे दापोडी ते निगडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईनचे काम केले जात आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. पदपथाच्या कडेला झाडे लावण्यासाठी माती टाकून जागा सोडण्यात आली आहे. तसेच, बीआरटी बॅरिकेट्सच्या कडेलाही काँक्रीटचे कठडे बसविण्यात आले आहेत. त्यात केवळ माती टाकली आहे. मात्र, झाडे न लावल्याने त्यात पावसाचे पाणी साचून राहत आहे. पाणी साचून तेथे डबके तयार झाले आहेत. त्यातून डासांची उत्पत्ती होत असल्याचे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
महापालिकेने शहरभरात अर्बन स्ट्रीट डिजाईनने पदपथ व सायकल ट्रॅक विकसित केले आहेत. त्यात झाडे लावली जात नाहीत. त्यामुळे पाणी साचते. तसेच, गवत व इतर झुंडपे तयार झाली आहेत. त्यामुळे शहर विद्रुप दिसत आहे.
उद्यान विभागाकडून वेळच्या वेळी झाडे लावली जात नसल्याने तसेच, गवत व झुंडपे काढली जात नसल्याने बकालपणा वाढला आहे. डास उत्पत्ती केल्याने महापालिकेकडून नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुसरीकडे महाालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिक रोष व्यक्त व्यक्त करीत आहेत.
यासंदर्भात महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, उद्यान विभागाकडून झाडे लावली जात नसल्याने त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. त्यातून वाहने ये-जा करीत असल्याने पदपथ व सायकल ट्रॅक घाण होत आहेत. त्यासंदर्भात उद्यान विभागास सूचना देण्यात आल्या आहेत, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.