

नवी सांगवी: कचरामुक्त शहर विभागामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला नुकताच पुरस्कार मिळाला. मागील आठ वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात प्रथमच कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन पुरस्कार मिळाला आहे. मात्र, शहराच्या कोणत्याही भागात गेले तरी रस्त्याच्या कडेला अथवा पूर्वी ज्या भागात कचराकुंडी होते तेथे कचर्याचे ढीग पाहण्यास मिळत आहे. यामुळे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी राबविलेली कचराकुंडीमुक्त शहर योजना फोल ठरली आहे.
पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, साठ फुटी रोड, रामकृष्ण चौक, पेरूच्या बागेचा रोड, लक्ष्मीनगर, गणपती विसर्जन घाट, राजीव गांधी वसाहत, कांकरिया गॅस गोडाऊन, वैदू वस्ती, जवळकरनगर, सुदर्शन चौक, त्रिमूर्ती चौक, सृष्टी चौक, तुळजाभवानी मंदिर परिसर आदी परिसरात रस्त्याच्या कडेला कचर्याचे ढीग लागलेले दिसून येत आहेत. रस्त्यावरील कचरा आता वेगळी समस्या निर्माण करत आहे.
शहराच्या विविध उपनगरांत ठिकठिकाणी कचर्याचे साचलेले ढीग दररोज पहावयास मिळत असताना शहराला स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोच्च पुरस्कार कसा मिळाला, अशी चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली. त्यामध्ये काहीअंशी यश आले; मात्र कचर्यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
उद्योगनगरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
इंदूरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर देशात स्वच्छ सर्वेक्षणात यावे यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात आले; परंतु अद्याप शहरातील रस्त्यांजवळील आणि पूर्वी कचराकुंडी होत्या त्या ठिकाणचा कचरा कमी झालेला दिसत नाही.
त्यामुळे महापालिकेची कचराकुंडीमुक्त शहर योजना फोल ठरली. शहर कचराकुंडीमुक्त करताना नियोजनाच्या अभावामुळे रस्त्याच्या कडेला जागोजागी कचर्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. हा कचरा जनावरे, कुत्री रस्त्यावर पसरवत आहेत. परिणामी हा कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
वारंवार तक्रार करून सुधारणा होत नाही. कचराकुंडी आता ठेवाच, त्यामुळे रस्त्यावर तरी नागरिक कचरा टाकणार नाहीत. या ठिकाणी येता जाता कचर्याचे साम—ाज्य पहावयास मिळते. खरच आम्ही राहतो तो परिसर स्मार्ट सिटी आहे का? आमच्या कुटुंबाचे आरोग्य सातत्याने खराब होत चालले आहे. याला जबाबदार कोण? याबाबत महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार देणार आहे.
- साहिल शेख, पिंपळे गुरव
येत्या दोन दिवसांत येथील परिसराची पाहणी करून कचरा संकलन करणार्या गाडीसोबत जाऊन माहिती घेतो. या दरम्यान रस्त्यावर कचरा टाकताना नागरिक आढळल्यास आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दोन दिवसांत कचर्याचे ढीग हलवून या परिसरात लक्ष केंद्रित करण्याचे अधिकार्यांना सांगण्यात येईल. नागरिकांनीदेखील स्मार्ट होणे अत्यावश्यक आहे.
- शंकर घाटे, मुख्य आरोग्य निरीक्षक, मनपा.