

वडगाव शेरी : वडगाव शेरी परिसरातील हरीनगरमधील नाल्यातील ड्रेनेजलाइन फुटल्यामुळे ओढ्याला मैलापाण्याचा पूर आला आहे. या मैलापाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यामुळे साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
लोहगावातून येणारा ओढा विमाननगर, रामवाडी, हरीनगर मार्ग कल्याणीनगरमध्ये नदीला मिळतो. या ओढ्याला पावसाळ्यात पूर येतो. याच ओढ्यातून महापालिकेने ड्रेनेजलाइन टाकली आहे. पावसाळ्यामध्ये नाल्याला पूर आला होता. त्या पुराच्या पाण्यामुळे नाल्यामधील दोन ड्रेनेज फुटले आहेत.
नाल्यामध्ये मैलापाणी सोडण्यात आले आहे. या मैलापाण्याचे प्रमाण खूप आहे. या मैलापाण्याचे डबके काही ठिकाणी साचले आहे. यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची संख्या वाढली आहे. मैलापाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.
याबाबत स्थानिक नागरिक सुधीर गलांडे म्हणाले, ड्रेनेजलाइन फुटली आहे. मैलापाणी नाल्यात साचून डबके झाले आहे. मैलापाण्याचा ओढ्याला पूर आला आहे. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे मैलापाणी साचून राहते. या मैलापाण्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. पालिकेने तत्काळ ही समस्या सोडविली पाहिजे.
याबाबत ड्रेनेज विभागाचे अधिकारी हेमंत देसाई यांनी सांगितले की, याविषयी नागरिकांची तक्रार आली आहे. नाल्याची पाहणी करून लवकरात लवकर समस्या सोडविली जाईल.