

वडगाव मावळ: भावकीतील मुलीला घरी सोडल्यावरून अगोदर झालेल्या भांडणाच्या रागातून येथील केशवनगर भागात एकावर गोळीबार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ रोहिदास वाघमारे (रा. कुरकुंडे, ता. खेड, जि. पुणे), अभिजित राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ (दोघेही रा. सांगवी, ता. मावळ) व प्रथमेश दिवे (रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय एकनाथ मोहिते (वय 28, रा. पवारवस्ती, केशवनगर, वडगाव मावळ) याने फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)
पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहिते याचा चुलत भाऊ हा वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत आहे. त्याने सोमवारी दुपारी अभिजित व रणजीत यांच्या भावकीतील मुलीला न्यू इंग्लिश स्कूल येथून तिच्या घरी सोडले होते. त्यावरून यातील आरोपींनी त्याला शाळेच्या बाहेरून स्कॉर्पिओमध्ये घेऊन मारहाण केली होती. त्यावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली होती.
याच वादातून सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अक्षय हा त्याच्या मित्रांसह केशवनगर येथील एकवीरा चौकात बसलेले असताना आरोपी रणजित ओव्हाळ व प्रथमेश दिवे हे दोघे दुचाकीवरून तेथे आले व अक्षयला शिविगाळ केली. त्यानंतर दोन्ही आरोपी तिथून जात असताना सौरभ वाघमारे व अभिजित ओव्हाळ हे दोघेजण स्प्लेंडर गाडीवरून तेथे आले व सौरभ याने शिवीगाळ करून लगेच पिस्टल बाहेर काढून ते कॉक करून अक्षयच्या दिशेने झाडले. परंतु ते फायर झाले नाही, त्यातील राऊंड खाली पडला.
या प्रकारामुळे अक्षय व त्याचे मित्र तिथून पळून जात असतानाच आरोपीने पुन्हा एकदा लोड करून फायर केले; परंतु अक्षयला गोळी लागली नाही. या गोळीबारमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. वडगाव पोलिसांनी चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या दोन पथकांनी अभिजित राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ (दोघेही रा. सांगवी, ता. मावळ) व प्रथमेश दिवे (रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे. तर सौरभ वाघमारे हा फरार आहे. पोलिस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत.