

पिंपरी : राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रत्येक विभागाचे सुशोभिकरण करून कामकाज सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या तळमजल्यावरील नगररचना विभागात फाईलीच्या गठ्ठांचे ढीग अक्षरश: जमिनीवर अस्ताव्यस्तपणे फेकून देण्यात आले आहेत. तसेच, मोकळ्या जागेत कपाटे उभी केल्याने ये-जा करण्यास अडचण होत आहे. हा विभाग गोदाम असल्याप्रमाणे जाणवत आहे.(Latest Pimpari chinchwad News)
राज्य शासनाच्या आदेशानुसार 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या महापालिकेच्या कामकाजातील ई-प्रशासन सुधारणा, महापालिका व नागरिकांमध्ये संवाद, महापालिका व उद्योगांशी सुसंवाद, दैनंदिन कामकाजाची कार्यप्रणाली सुलभ करणे, पारदर्शक व गतिमान कारभारास कार्यालयाचे सुशोभिकरण करणे, संकेतस्थळ, आपले सरकार, ई ऑफिस, डॅश बोर्ड, नावीन्य पूर्ण वेब ॲप्लिकेशन तयार करणे आदींचा त्या आराखड्यात समावेश आहे.
मागील 100 दिवसांच्या कृती
आराखड्यात महापालिकेतील सर्व विभागात स्वच्छता करून सुशोभिकरण करण्यात आले होते. नगररचना विभागातही चकाचक करण्यात आला होता. ती स्पर्धा झाली. महापालिकेस दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर नगररचना विभाग पुन्हा आपल्या नेहमीच्या सवयीवर आला आहे.
अनेक फायलींचे गठ्ठे एका रिकाम्या कोपऱ्यात अक्षरश: फेकून देण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे गठ्ठ्यांचे ढिग साचले आहेत. तसेच, आवारात मोठमोठी कपाटे लावण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांना ये-जा करणे गैरसोयीचे ठरत आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर फाईलींचे ढिग साचले आहेत. त्याचा नियमितपणे निपटारा केला जात नसल्याने या विभाग एका गोदामासारखे चित्र दिसून येत आहे. या परिस्थित त्या कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अभिलेख विभागाकडे जागेची मागणी
नगररचना विभागाकडे नकाशे व फायलीची संख्या भरमसाट आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. विभागाची जागा कमी असल्याने मर्यादा येत आहेत. त्यासाठी नेहरूनगर येथील अभिलेख विभागात जागेची मागणी केली आहे. तेथे जागा उपलब्ध झाल्यानंतर सर्व फाईली त्या ठिकाणी हलविल्या जाणार आहेत, असे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिका भवनातील तळमजल्यावरील नगररचना विभागात अस्ताव्यस्तपणे पडलेल्या फाईलीच्या गठ्ठयांचे ढीग.