

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘श्रमदान एक दिवस-एक तास-एक साथ’ या उपक्रमाची सुरुवात निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातून गुरुवारी (दि. 25) करण्यात आली. या मोहिमेत दोन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. भक्ती-शक्ती चौकातून ट्रान्सपोर्टनगरी चौक, देहूरोड चौक, अंकुश चौक, पिंपरी चौक, आकुर्डी चौक याठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी सुमारे 12 टन कचरा गोळा करण्यात आला.
या उपक्रमाची सुरुवात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, महेश आढाव, शांताराम माने, तानाजी दाते, कुंडलिक दरवडे, अंकुश झिटे, राजेश भाट, सुधीर वाघमारे, माजी नगरसेवक सचिन चिखले, नारायण बहिरवाडे, त्रिपुरा राज्यातील आगरतळा महापालिकेचे शिष्टमंडळ, स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. (Latest Pimpari chinchwad News)
सफाई मित्रांचे योगदान
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, की स्वच्छता सर्वेक्षणात शहराने देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने योगदान हे आपल्या सफाई मित्रांचे आहे. शहरामध्ये दैनंदिन स्वच्छता राहावी, यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. पुढील सर्वेक्षणात आपल्याला देशात अग्रेसर यायचे आहे.
त्या अनुषंगाने महापालिका विविध उपक्रम राबवत असून, नागरिकदेखील या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. या वेळी नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. झुंबा नृत्यात नागरिकांनी सहभाग घेतला. उपायुक्त सचिन पवार यांनी प्रास्ताविकात स्वच्छतेच्या मोहिमेची माहिती दिली. सूत्रसंचालन जनतासंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक व आर. जे. बंड्या यांनी केले.
नव्या बॅण्ड ॲम्बेसिडरची घोषणा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेच्या बॅण्ड ॲम्बेसिडरची घोषणा करण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयासाठी पवन शर्मा, ब क्षेत्रीय कार्यालयासाठी मोहन गायकवाड, अरविंद भोसले, तानाजी भोसले, ड क्षेत्रीय कार्यालयासाठी डॉ. नंदकुमार धुमाळ, बाळासाहेब साळुंखे, ई क्षेत्रीय कार्यालयासाठी विलास नाईकनवरे, सुजाता परदेशी, फ क्षेत्रीय कार्यालयासाठी सुनील कदम, ग क्षेत्रीय कार्यालयासाठी मनीषा राठोड, ह क्षेत्रीय कार्यालयासाठी अदिती निकम आणि शहरासाठी आर. जे. बंड्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.