

पंकज खोले
पिंपरी : निगडी येथे कामासाठी चेंबरच्या डक्टमध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहर हळहळले. यापूर्वी देखील वेगवेगळ्या घटनांमध्ये मजूर, बांधकाम कामगारांचा हकनाक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कोणतीही सुरक्षासाधने न वापरता काम करणे; तसेच संबंधित मजुरांना अशा प्रकारची कामे करण्यासाठी प्रशिक्षण न देणे व ठेकेदारांचे दुर्लक्ष या घटनांना कारणीभूत ठरत आहे. या दुर्घटनेवरून कामगार संघटना आक्रमक झाल्या असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. (Pimpari Chinchwad News)
उद्योगनगरीत विविध कारणांसाठी विविध ठिकाणी मजूर, बांधकाम कामगार आणि हेल्पर काम करत असतात. त्यामध्ये शासकीय व निमशासकीय कंपन्याही ठेकेदारामार्फत काम करवून घेतात. त्यात खोदकाम, भूमिगत केबल टाकणे, विकासकाम अंतर्गत पदपथ अथवा रस्त्याची दुरुस्ती अशा वेगवेगळ्या कामासाठी शहरात हे गोरगरीब कामासाठी आलेले असतात; मात्र ही कामे करताना त्यांच्या जीविताबाबतच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचे अनेक प्रकरणात दिसून येते. उंचावर काम करणार्या कामगारांना हेल्मेट, हातमोजे, पायात बुट अथवा रेडियमचे जर्किन अशा सुविधा दिल्या जात नाहीत. हातावर पोट असल्याने वेगवेगळ्या राज्यातून आलेले हे कामगारही दोन वेळच्या अन्नसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात; मात्र अशा बेफिकिरीमुळे दुर्घटना घडून अनेक कामगार जखमी होतात, तर काही कामगारांचा हकनाक बळी जातो.
शहरात शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह होता. झेंडावंदन कार्यक्रमानंतर सर्वत्र सुटीचा दिवस असताना, दुपारच्या वेळी तीन मजूर कामगारांच्या मृत्यूची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा ठरली. गेल्या आठवड्यात नांदेड सिटी येथे देखील मातीच्या ढिगार्याखाली अडकल्याने एका मजुराचा मृत्यू झाला होता. तसेच, शहरातील विविध बांधकाम साईट आणि उंचावरील काम करताना बांधकाम मजुरांच्या मृत्यूच्या घटना घडतात. तर, अनेक जण जखमी देखील होतात. मात्र, याविषयी संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ही प्रकरणे अनेकदा समोर येत नाहीत. त्यामुळे गोरगरीब असलेल्या मजुरांचे मरण स्वस्त झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दुर्घटना होवूनही संबंधित मजुरांना वेळेवर मदत मिळाली नसल्याचे समोर आले आहे. तसेच, या घटनेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करण्यात आला होता. तसेच, त्यांना संदेश पाठविण्यात आले. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच, कोणती मदतही पाठवली नसल्याचा आरोप केला जात आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी आवश्यक उपकरणे ठेवणे गरजेचे, मजूरांना योग्य ते प्रशिक्षण गरजेचे
दुर्घटनेस जबाबदार ठेकेदारास काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल व्हावा.
दुर्घटनेनंतर जखमींच्या खर्चाची जबाबदारी संबंधितांनी स्वीकारावी.
मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी समिती स्थापन करावी.
प्रत्यक्षात त्या तीन कंत्राटी कर्मचार्यांना कामाची योग्य माहिती व प्रशिक्षण देणे आवश्यक होते. यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कंत्राटदारासोबतचा करार रद्द करत दोषी विरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी. जेणेकरुन अशी घटना पुन्हा घडणार नाही. चेंबर बांधण्यासाठी अथवा त्याच्या अटीशर्तीची कल्पना महापालिकेला नव्हती का, असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
अॅड. सागर चरण, माजी सदस्य जिल्हा दक्षता समिती
शहरातील मजुर, कामगारांच्या प्रश्नाविषयी आम्ही लढत आहोत. शहरात अशी दुर्घटना घडूनही सरकारला, प्रशासनाला जाग येत नाही. या विरोधात संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
काशिनाथ नखाते, कष्टकरी संघर्ष महासंघ, प्रदेशाध्यक्ष
स्थानिक पोलिसांकडे याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मजुरांच्या मृत्यूनंतर तत्काळ संंबंधितावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मृतांच्या कुटुंबियांना कायदेशीर व आर्थिक सहायाची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. कामगारांच्या सुरक्षिततेच्या आणि हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहावे.
बाबा कांबळे, कष्टकरी कामगारा पंचायत, अध्यक्ष