पाण्याची टाकी अंगावर कोसळून चार ते पाच मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी सातच्या सुमारास सद्गुरुनगर, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्गुरुनगर, भोसरी येथे एका खासगी कंपनीचा लेबर कॅम्प आहे. येथील मजुरांनी मुबलक पाणी मिळावे, यासाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यानुसार, नुकतेच कंपनीने काही फूट उंचीवर पाण्याची टाकी बांधली होती.
दरम्यान, आज सकाळी टाकीत पाणी सोडले असता टाकीचे बांधकाम कोसळले. त्याखाली दहा ते पंधरा मजूर अडकले. यातील चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.