

पिंपरी : शहरात मुक्या प्राण्यांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील 15 महिन्यांत शहरात अशा 40 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, प्राणिप्रेमी आणि कार्यकर्त्यांच्या मते ही आकडेवारी केवळ नोंद झालेल्या गुन्ह्यांची असून, प्रत्यक्षात अनेक प्रकरणे दुर्लक्षित आहेत. भीती, अनास्था आणि कायद्याची माहिती नसल्यामुळे अत्याचाराच्या अनेक घटना झाकोळल्या जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
काळेवाडी परिसरात एका भटक्या श्वानाला अमानुषपणे मारहाण करून ठार केल्याची घटना नुकतीच समोर आली. त्याआधी महिंद्रा अँथिया सोसायटी परिसरात विषप्रयोग करून नऊ भटक्या श्वानांचा बळी घेण्यात आला होता. या दोन घटना घडताच शहरभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. प्राणिप्रेमी संघटनांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली असून, श्वानासह अन्य मुक्या प्राण्यांवर सातत्याने होणारे अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भारतात प्राण्यांच्या हक्कांचं संरक्षण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. 1960 मधील प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्टअंतर्गत कोणत्याही मुक्या प्राण्यावर जाणीवपूर्वक इजा करणे, विष देणे, उपाशी ठेवणे, वेदना देणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. प्रथमच गुन्हा सिद्ध झाल्यास तीन महिने तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. मात्र, तोच गुन्हा पुन्हा केल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याव्यतिरिक्त, 2023 मध्ये लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 325 नुसार, प्राण्याला मारणे किंवा अशा प्रकारे मारहाण करणे ज्यामुळे त्याचा मृत्यू होणेे, हे गंभीर गुन्ह्यांत मोडते. या प्रकरणात आरोपीस पाच वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो.
प्राणिप्रेमी संघटनांनी सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम, सीसीटीव्ही व्यवस्थापन, श्वानांसाठी अन्न-पाण्याची शिबिरे आणि प्रभागनिहाय प्राणी कल्याण समित्या सक्रिय करण्याचे मत मांडले आहे. तसेच, शाळा-महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांमध्ये प्राणिप्रेम आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचाही प्रयत्न व्हावा, अशी देखील मागणी होत आहे.
प्रत्येक प्रभागात प्राणी कल्याण समिती स्थापन करावी
शाळांमध्ये प्राणिप्रेम जनजागृती करावी
सोसायट्यांत श्वानांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करावी
सीसीटीव्ही आणि गस्त यंत्रणा बळकट करणे
हॉटलाइन वा अॅपद्वारे तत्काळ तक्रार नोंदणीची सुविधा
नागरिकांची भूमिका महत्त्वाची
तातडीने पोलिसांत तक्रार करा
एनजीओ किंवा प्राणिप्रेमींशी संपर्क करा
घटनांचा पुरावा फोटो, व्हिडीओ संकलित ठेवा
समाज माध्यमांवर जनजागृती वाढवा